कल्याण- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रासाठीच्या जवळपास 41 हजार कोटींच्या योजनांची घोषणा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सकाळी मुंबईत दाखल होणार असून, एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते राजभवन येथे टाइमलेस लक्ष्मण या पुस्तकाचं प्रकाशन करणार आहेत.मोदी यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी एक वाजता कल्याणमधील फडके मैदानात कार्यक्रम होणार आहे. आघाडी सरकारच्या काळात ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वे प्रकल्पाची घोषणा झाली होती. तसेच दहिसर-मीरा-भाईंदर मेट्रो रेल्वेमार्गासह पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रो व सिडकोच्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभासाठी येणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, शिक्षणमंत्री विनोद तावडे, खा. कपिल पाटील यांच्यासह ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे. रस्त्यावर श्रेयवादाची बॅनरबाजी सुरू असली तरी राजशिष्टाचारानुसार शिंदे पिता-पुत्रास व्यासपीठावर स्थान दिले आहे.महापौर विनिता राणे यांना कार्यक्रमास बोलावले असले तरी त्यांना व्यासपीठावर स्थान दिलेले नाही. बॅनरवर मोदी यांचा कार्यक्रम दुपारी एक वाजता असल्याचे नमूद केला असले तर सरकारी कार्यक्रमपत्रिकेत कार्यक्रमाची सुरुवात चार वाजता होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहेत. व्यासपीठावरील मोजक्याच लोकांना प्रत्येकी पाच मिनिटे बोलण्याची अनुमती दिली जाणार आहे. तर मोदी यांचे भाषण तब्बल 35 मिनिटे होणार आहे, असे कार्यक्रमपत्रिकेत नमूद केले आहे.
महाराष्ट्रासाठी गूड न्यूज! मोदी आज करणार 41 हजार कोटींच्या योजनांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 08:16 IST