एसटी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; जूनपासून मूळ वेतनावर ५३ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 06:04 IST2025-06-04T06:03:33+5:302025-06-04T06:04:01+5:30
एक कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच

एसटी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; जूनपासून मूळ वेतनावर ५३ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर जून २०२५ पासून ५३ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या कर्मचाऱ्यांना ४६ टक्के महागाई भत्ता दिला जातो, त्यात ७ टक्के वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत निधीची उपलब्धता पाहून निर्णय घेण्यात येणार आहे.
त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यापैकी एक योजना निवडण्याचा पर्याय, तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पास नऊ ऐवजी १२ महिन्यांसाठी देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. याचा लाभ सुमारे ३५ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी हे निर्णय घेण्यात आले.
एक कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच
ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन खाते स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये आहेत अशांचा कर्तव्यावर असताना-नसताना अपघातात निधन झाल्यास एक कोटी, पूर्णतः अपंगत्व आल्यास एक कोटी, अंशतः अपंगत्व आल्यास ८० लाख रुपयांपर्यंत विमा रक्कम दिली जाईल.