"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 16:29 IST2025-06-29T16:28:34+5:302025-06-29T16:29:25+5:30
Maharashtra Assembly Monsoon Session 2025: राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, शेतकऱ्यांप्रति सरकारची असंवेदनशीलता, बळीराजाची होत असलेली दयनीय अवस्था, विविध भ्रष्टाचारात मंत्र्यांचा हात यामुळे सरकारने पावसाळी अधिवेशनापूर्वी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याची घोषणा महाविकास आघाडीने केली आहे.

"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
मुंबई - राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, शेतकऱ्यांप्रति सरकारची असंवेदनशीलता, बळीराजाची होत असलेली दयनीय अवस्था, विविध भ्रष्टाचारात मंत्र्यांचा हात यामुळे सरकारने पावसाळी अधिवेशनापूर्वी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. यावेळी महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापान कार्यक्रमाला जायचं म्हणजे पापच, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अजिंक्यतारा या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारच्या कार्यकाळात झालेले घोटाळे, अत्याचाराच्या घटना, राज्यातील जनतेची व शेतकऱ्यांची सरकारकडून होत असलेली फसवणूक यावर ताशेरे ओढले. सत्ताधारी पक्षाचे लोकं वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभागी आहेत, पोलिसांचं त्यांना संरक्षण आहे, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री त्यांना प्रोत्साहन देतायतं, नेमकं भाजप आणि गद्दारांनी आपला महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला आहे, अशी टीका दानवे यांनी केली.
या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे, प्रतोद व आमदार सुनील प्रभू, आमदार सचिन अहिर, काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ उपनेते अमीन पटेल, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, शशीकांत शिंदे उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापान कार्यक्रमाला जायचं म्हणजे पापच, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. भ्रष्टाचाराचे डाग घेऊन जे लोकं चहापान कार्यक्रमाला जातील, त्याच लोकांकडे बघून मुख्यमंत्री म्हणतील, ह्याच लोकांवर मी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी टोला लगावला. ज्या महामार्गाला माझ्या आजोबांचं नाव दिलं गेलं; त्यावरच खड्डे पडले आहेत, नदी वाहत आहे, हे नेमकं काय चाललंय? असा सवालहीआदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.