"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 16:37 IST2025-08-21T16:37:24+5:302025-08-21T16:37:54+5:30
Harshvardhan Sapkal News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तत्वाने चालणाऱ्या पक्षात आहेत. त्यांच्या केसालाही हात लावण्याची धमक नथुराम गोडसेच्या औलादीमध्ये नाही, असे स्पष्ट करत ‘गरजनेवाले बादल बरसते नही’, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.

"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
मुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तत्वाने चालणाऱ्या पक्षात आहेत. त्यांच्या केसालाही हात लावण्याची धमक नथुराम गोडसेच्या औलादीमध्ये नाही, असे स्पष्ट करत ‘गरजनेवाले बादल बरसते नही’, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.
काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी देण्याच्या प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ‘मूंह में राम, बगल में छुरी’, ही भाजपाची मोडस ऑपरेंडी आहे. महात्मा गांधी यांचा खून करण्याआधी नथुराम गोडसे सुद्धा गांधीजींच्या पाया पडला व नंतर तीन गोळ्या झाडल्या हा इतिहास आहे. आजही त्या गोडसेचे गुणगान गाणाऱ्या औलादींना भाजपा पोसत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. धमकी देणारा म्हणतो ‘आम्ही नथुराम गोडसे होऊ’ ते तर नथुराम गोडसे आहेतच पण तुमचा पक्षही नथुराम गोडसेंच्या विचाराने चालला आहे. तर बाळासाहेब थोरात हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तत्वाने चालणाऱ्या पक्षात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यातील वातावरण खराब करावे म्हणून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांविरोधात अशी वक्तव्ये करून प्रसिद्धी मिळवण्याचा काहींचा प्रयत्न दिसत आहे..
सपकाळ पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष अशा लोकांना का पाळतो, याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल. भाजपाने असे राजकारण करू नये आणि आज भाजपा विरोधकांवर ज्यांना सोडतो तेच उद्या भाजपाच्या अंगावर येतील असा इशारा देत अशा धमक्या देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच प्रोत्साहन आहे त्यामुळे कारवाई होणारच नाही, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.