महाराष्ट्र पोलिसांना ४८ तासांची मोकळीक द्या; 'लोकमत'च्या मुलाखतीतील राज ठाकरेंचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 11:03 AM2024-02-09T11:03:50+5:302024-02-09T11:04:19+5:30

जर पोलिसांनी एखादी भूमिका घेतली आणि त्यांना जेलमध्ये जावं लागत असेल तर ते का जेलमध्ये जातील असं राज ठाकरेंनी म्हटलं होते.

Give Maharashtra Police 48 Hours; Raj Thackeray's video Tweet from MNS After Abhishek Ghosalkar's murder | महाराष्ट्र पोलिसांना ४८ तासांची मोकळीक द्या; 'लोकमत'च्या मुलाखतीतील राज ठाकरेंचा व्हिडीओ व्हायरल

महाराष्ट्र पोलिसांना ४८ तासांची मोकळीक द्या; 'लोकमत'च्या मुलाखतीतील राज ठाकरेंचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई - राज्यात घडणाऱ्या गोळीबार आणि हत्येच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्हवेळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यातच मनसेकडूनराज ठाकरेंचा जुना व्हिडिओ ट्विट करत महाराष्ट्र पोलिसांना ४८ तासांची मोकळीक द्या अशी मागणी करण्यात आली आहे. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्यात गेल्या वर्षी राज ठाकरे यांची महामुलाखत झाली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, आपल्या देशात कायदे आहेत. फक्त कायदा आहे मात्र आदेश नाहीत. आदेशाची वाट पाहतायेत. जर आदेश मिळाले तर माझा मुंबई पोलिसांवर १०० टक्के विश्वास आहे. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस यांच्या हातात ४८ तासांची मोकळीक द्या आणि मला महाराष्ट्र साफ करून द्या असं सांगा. सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात फक्त आदेश नसतात मग रिस्क कोण घेईल असं त्यांनी म्हटलं होते. 

त्याचसोबत जर पोलिसांनी एखादी भूमिका घेतली आणि त्यांना जेलमध्ये जावं लागत असेल तर ते का जेलमध्ये जातील, कोणासाठी जातील? वर बसलेलाच माणूस तात्पुरता आहे. त्याच्यासाठी पोलिसांनी पर्मनंट जेलमध्ये जायचं याला काही अर्थ आहे का? आपल्याकडे उत्तम काम करणारे पोलीस अधिकारी आहेत. महाराष्ट्र त्याबाबतीत भाग्यवान आहे. परंतु त्यांना तुम्ही ४८ तासांचा मोकळा हात द्या असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. 

दरम्यान, महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राखायची असेल आणि राज्यातील बेछूट गोळीबार, टोळीयुद्ध, गु्न्हेगारांचा मुक्त संचार, कोयता गँगचा उच्छाद, मुलींचे अपहरण हे गुन्हे थांबवायचे असतील तर ४८ तासांसाठी महाराष्ट्र पोलिसांना मोकळीक द्या, महाराष्ट्रातून गुन्हेगारी नाहीशी होईल अशी मागणी मनसेने केली आहे. मागील १५ दिवसांत राज्यात गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. त्यात कल्याणमध्ये भाजपा आमदाराने थेट पोलीस ठाण्यातच गोळीबार करत शिवसेना शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर जळगावात भाजपाच्या माजी नगरसेवकावर हल्ला झाला आणि नुकताच मुंबईतील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. लागोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे राज्यातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. उघडपणे होणारे गोळीबार पाहता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. 

Read in English

Web Title: Give Maharashtra Police 48 Hours; Raj Thackeray's video Tweet from MNS After Abhishek Ghosalkar's murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.