पुण्यातील हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयाला पकडण्यात आलं आहे. पुण्यातील खराडीतील एका फ्लॅटमध्ये ही रेव्ह पार्टी करण्यात येत होती. प्रांजल खेवलकर आणि प्रसिद्ध बुकी निखील पोपटा यांच्यासह 7 जणांना ताब्यात घेण्यात आलं. याच दरम्यान गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
"माझ्याकडे याबाबत माहिती नाही . मी काल पंढरपूरला होतो. रात्री उशिरा मी नाशिकला आलो. एकनाथ खडसे यांचे जावई रेव्ह पार्टीमध्ये होते ही बातमी मी टीव्हीवर पाहिली. प्रांजल खेवलकर हे या पार्टीत होते. त्यांनी ही पार्टी आयोजित केली होती. मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ मिळाले आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. तिथल्या पोलिसांशी अद्याप संपर्क झालेला नाही. टीव्हीवरूनच मला याबाबत माहिती मिळाली."
"जावई अमली पदार्थसह रेव्ह पार्टी करताना सापडले"
"एकनाथ खडसे यांनी कालच चाळीसगावमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ कुठून येतात असा सवाल उपस्थित केला होता. आज त्यांचे जावई अमली पदार्थसह रेव्ह पार्टी करताना सापडले आहेत, पोलीस तपास करत आहेत. मोठी घटना होती. पार्टी सुरू होती आणि या पार्टीत किती महिला होत्या आणि किती पळाले याबाबत मला माहिती नाही."
"प्रत्येकवेळी आपल्यासोबत षडयंत्र कसं होतं?"
"नाथाभाऊंनी जावईबापुंना अलर्ट केलं पाहिजे होतं. या गोष्टीला काही अर्थ नाही. जे झालं आहे ते मान्य करायला हवं. याबाबतत चौकशी होईल. प्रत्येकवेळी आपल्यासोबत षडयंत्र कसं होतं? काय असेल ते समोर येईल. जावई लहान मुलगा नाही की त्याला रात्री उचलून नेऊन तिथे बसवण्यात आलं" असं म्हणत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे.