आजरा घनसाळला भौगोलिक उपदर्शन मानांकन

By Admin | Updated: June 8, 2015 00:59 IST2015-06-08T00:59:16+5:302015-06-08T00:59:50+5:30

केंद्राची मान्यता : जगभरात ‘ब्रॅँड नेम’ने विकला जाणार; सांगलीच्या बेदाण्याचाही समावेश

Geography Geography | आजरा घनसाळला भौगोलिक उपदर्शन मानांकन

आजरा घनसाळला भौगोलिक उपदर्शन मानांकन

अशोक डोंबाळे --ल्सांगली -कृषी विभागाच्या प्रयत्नामुळे अखेर केंद्र शासनाने आजरा घनसाळला प्रमुख कृषी व फलोत्पादन पिकांचे भौगोलिक उपदर्शन मानांकन दिले आहे. यामुळे ‘आजरा घनसाळ’ नावाने येथील शेतकरी देशातच नव्हे, तर जगभर आजरा घनसाळची विक्री करू शकणार आहेत.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत भौगोलिक मानांकन नोंदणीसाठी महाराष्ट्रातून २२ कृषी व फलोत्पादन पिकांची निवड करण्यात आली होती. ती नावे केंद्र शासनाकडे पाठविली होती. हे मानांकन मिळविण्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्य शासनाने पुणे येथील सल्लागार संस्थेची नियुक्ती केली होती. या संस्थेसह पंधरा जिल्ह्यांतील शेतकरी, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीत २८ मे रोजी कृषितज्ज्ञांच्या निवड मंडळासमोर पिकांच्या गुणवत्तेचे सादरीकरण केले. बैठकीनंतर दोन दिवसांनी केंद्रीय कृषितज्ज्ञांनी महाराष्ट्रातील २२ धान्य-कडधान्य, भाजी व फळ पिकांपैकी सांगलीचा बेदाणा, सोलापूरचे डाळिंब, मंगळवेढ्याचा शाळू, जळगावची केळी, भरताचे वांगे, कोल्हापूरचा आजरा घनसाळ तांदूळ, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कोकम, नवापूर व नंदुरबारची तूर या पिकांना भौगौलिक उपदर्शन मानांकन दिले. या पिकांचे बोधचिन्ह (लोगो) बनविण्याच्या सूचनाही कृषी विभागाच्या (पान १ वरून) अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सांगलीच्या बेदाण्यास भौगोलिक मानांकन देताना त्याची चव, रंग, वातावरणातील बदलाचा परिणाम, बेदाण्यासाठीच तयार करण्यात येणारी द्राक्षे, आदींचा विचार केला आहे. या मानांकनामुळे ‘सांगलीचा बेदाणा’ म्हणूनच तो देशात आणि जगात ओळखला जाणार आहे. शेतकऱ्यांनी बेदाणा तयार केल्यानंतर द्राक्ष बागायतदार संघाकडे नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतरच ते ‘सांगलीचा बेदाणा’या नावाने त्याची विक्री करू शकतात. लवकरच आकर्षक बोधचिन्ह (लोगो) तयार केले जाणार असून, त्याची छपाई केलेल्या पिशव्यांतून जगभर सांगलीचा बेदाणा विकला जाणार आहे. जगभरातील व्यापारी बेदाण्याची मागणी आॅनलाईनही करू शकतील. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून बेदाणा उत्पादकांची होणारी पिळवणूक आपोआपच थांबणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

यांना मिळाले मानांकन
सांगलीचा बेदाणा, सोलापूरचे डाळिंब, मंगळवेढ्याचा शाळू, जळगावची केळी, भरताचे वांगे, कोल्हापूरचा आजरा घनसाळ तांदूळ, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कोकम, नवापूर व नंदुरबारची तूर.


हळद अडकली तांत्रिक अडचणीत
महाराष्ट्र शासनाने राज्यातील २२ फळे व धान्य- कडधान्य पिकांच्या भौगोलिक उपदर्शन मानांकनासाठी शिफारस केली होती. यामध्ये सांगलीच्या हळदीचाही समावेश होता. केंद्राच्या कृषितज्ज्ञांसमोर हळदीच्या वेगळेपणाबद्दल सादरीकरणही झाले असून, एका खासगी संस्थेचे प्रतिनिधी त्यासाठी तेथे गेले होते. मात्र, त्यात शेतकऱ्यांचा समावेश नसल्याचे आढळून आले. यामुळे एखाद्या खासगी संस्थेला हळदीचे भौगोलिक उपदर्शन मानांकन देणे योग्य नसल्यामुळे हळदीचा प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आला आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित संस्थेची आणि हळद उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती मागविली आहे. त्यानंतर हळदीलाही भौगोलिक उपदर्शन मानांकन मिळण्याची शक्यता आहे.


केंद्र शासनाने बेदाण्यास मानांकन दिल्यामुळे त्याचा विक्रीसाठी निश्चितच फायदा होणार आहे. शेतकऱ्यांमध्ये जागृती करून द्राक्ष बागायतदार संघाच्या माध्यमातून बेदाणा विक्रीची मोठी बाजारपेठ तयार होण्यास मदत होईल.
- सुभाष आर्वे, उपाध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघ.

Web Title: Geography Geography

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.