खऱ्या अर्थाने खंडेरायाची जेजुरी होणार आता ‘सोन्याची’ ...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 18:53 IST2018-09-29T18:44:57+5:302018-09-29T18:53:20+5:30
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या मुख्य मंदिरावरील कळस आता सोन्याचा होणार असून शुक्रवारी (दि. २८) देवसंस्थानच्यावतीने विधिवत धार्मिक विधी करत या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे.

खऱ्या अर्थाने खंडेरायाची जेजुरी होणार आता ‘सोन्याची’ ...!
जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या मुख्य मंदिरावरील कळस आता सोन्याचा होणार असून शुक्रवारी (दि. २८) देवसंस्थानच्यावतीने विधिवत धार्मिक विधी करत या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे.
जेजुरीच्या खंडेरायाला राज्यातील भाविकांनी देणगीदान व नवसपूर्तीसाठी अर्पण केलेल्या आणि देवसंस्थानच्या ताब्यात असलेल्या सोन्याच्या विविध अलंकारांमधून व चीजवस्तूंमधून मुख्य मंदिरावरील कलश सोन्याचे करण्यात येत आहे. यासाठी सुमारे दीड किलोपर्यंत शुद्ध सोने वापरण्यात येणार आहे. या कामासाठी राजस्थान येथून कुशल कारागीर बोलाविण्यात आले आहेत. सुमारे आठवडाभर इन कॅमेरा हे काम चालणार आहे. याबाबत माहिती देताना विश्वस्त पंकज निकुडे पाटील व शिवराज झगडे यांनी सांगितले, पुरातन काळापासून खंडेरायाची जेजुरी सोन्याची नगरी म्हणून प्रचलित आहे. हे नाव सार्थ करण्यासाठीच मुख्य मंदिराच्या कलशापासून शुभारंभ करण्यात येत आहे. तसेच खंडेरायाच्या मुख्य मंदिरावरील कळस सोन्याचा करण्याबाबत मागील काळापासून भाविक व ग्रामस्थ मंडळ मागणी करीत होते. राज्यातील भाविकांनी देणगीदान व नवसपूर्तीसाठी अर्पण केलेल्या विविध सोन्याच्या अलंकारांतून शुद्ध सोने तयार करून हे काम करण्यात येत आहे.
पुढील आठवड्यात होणारी सोमवती यात्रा त्यानंतर नवरात्र व दसरा उत्सव असल्याने त्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यावेळी देवसंस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, व्यवस्थापक दत्तात्रय दिवेकर, तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.