"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 15:15 IST2025-12-28T15:14:43+5:302025-12-28T15:15:24+5:30
बारामतीत राजकीय भेदाभेद बाजूला ठेवून गौतम अदानींच्या स्वागताला संपूर्ण पवार कुटुंब एकवटल्याचे पाहायला मिळाले

"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
Supriya Sule: राजकारणाच्या मैदानात एकमेकांसमोर दंड थोपटणारे पवार कुटुंबीय आज बारामतीत एका वेगळ्याच रूपात पाहायला मिळाले. निमित्त होते अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या हस्ते शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या केंद्राच्या उद्घाटनाचे. या सोहळ्याने केवळ तंत्रज्ञानाचा नवा टप्पा गाठला नाही, तर गेल्या अनेक महिन्यांपासून विखुरलेले पवार कुटुंब एकाच मंचावर आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावेळी पवार कुटुंबियांकडून गौतम अदानी यांचे जोरदार कौतुक करण्यात आले.
गौतम अदानींचे बारामतीत आगमन होताच एक अभूतपूर्व दृश्य पाहायला मिळाले. आमदार रोहित पवार यांनी स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसून अदानींच्या गाडीचे सारथ्य केले. विशेष म्हणजे, त्यांच्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार बसले होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून काका-पुतण्याने एकाच गाडीतून अदानींचे स्वागत केल्याने उपस्थित सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यानंतर शरद पवार आणि पवार कुटुंबियांच्या उपस्थितीत भव्य केंद्राचे लोकार्पण पार पडले.
"गौतम अदानी माझ्यासाठी मोठ्या भावासारखे" - सुप्रिया सुळे
या सोहळ्यादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधले. अदानींशी असलेल्या कौटुंबिक संबंधांवर भाष्य करताना, गौतम अदानी हे माझ्यासाठी मोठ्या भावासारखे आहेत, असं म्हटलं.
"अदानी आणि पवार कुटुंबाचे गेल्या ३० वर्षापासून प्रेमाचे संबंध आहेत. माझ्यासाठी गौतम अदानी हे मोठ्या भावासारखे आहेत. कधी आयुष्यातील कुठलीही चांगली किंवा कडू बातमी कुठल्या भावाला सांगते तर ते हे आहेत. कधी कधी ते हक्काने मला रागवतात ही. गौतम अदानी हे फक्त भारतातच नाही तर जगातही यशस्वी झाले आहेत आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. या विधानामुळे उद्योगपती आणि पवार कुटुंबातील जिव्हाळ्याचे संबंध पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.
शरद पवार हे माझे मार्गदर्शक- गौतम अदानी
"शरद पवारांना गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ओळखणे हे माझे भाग्य आहे आणि त्यांच्याकडून मी जे काही शिकलो ते अतुलनीय आहे. ज्ञानापलीकडे, त्यांची समजूतदारपणा आणि सहानुभूती ही सर्वात खोलवरची छाप सोडते. मी अनेक वेळा बारामतीला भेट दिली आहे आणि शरद पवार यांनी येथे जे साध्य केले आहे ते विकासापेक्षा खूप जास्त आहे. त्यांच्यासारखा नेता चांगले राजकारण काय असते हे दाखवतो. त्यांनी शेतीमध्ये परिवर्तन घडवून आणले आहे, सहकारी संस्थांना बळकटी दिली आहे आणि उद्योजकतेला चालना दिली आहे," असं गौतम अदानी यांनी म्हटलं.
एकाच मंचावर पवार कुटुंबाची मांदियाळी
विभाजनानंतर पहिल्यांदाच पवार कुटुंबातील सर्व प्रमुख चेहरे एकाच कार्यक्रमात सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार आणि कुटुंबातील इतर सदस्य अदानींच्या स्वागतासाठी उपस्थित होते.