"गौरी, तुझ्या मृत्यूला कारणीभूत असलेल्याला नक्कीच शिक्षा मिळेल, कुणी रक्ताचं असलं तरी", प्रशांत गडाखांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 01:19 PM2021-01-01T13:19:10+5:302021-01-01T13:24:52+5:30

Prashant Gadakh News : राज्य सरकारमधील मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी गडाख यांनी दोन महिन्यांपूर्वी राहत्या घरी आत्महत्या केली होती. या प्रकरणी गौरी गडाख यांचे पती प्रशांत गडाख यांनी आता आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

"Gauri, the one who caused your death will definitely be punished, even if someone is relative." - Prashant Gadakh | "गौरी, तुझ्या मृत्यूला कारणीभूत असलेल्याला नक्कीच शिक्षा मिळेल, कुणी रक्ताचं असलं तरी", प्रशांत गडाखांची भावना

"गौरी, तुझ्या मृत्यूला कारणीभूत असलेल्याला नक्कीच शिक्षा मिळेल, कुणी रक्ताचं असलं तरी", प्रशांत गडाखांची भावना

googlenewsNext

मुंबई/अहमदनगर - राज्य सरकारमधील मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी गडाख यांनी दोन महिन्यांपूर्वी राहत्या घरी आत्महत्या केली होती. या घटनेवरून त्यावेळी अनेक तर्कवितर्क लढवले गेले होते. दरम्यान, या प्रकरणी गौरी गडाख यांचे पती प्रशांत गडाख यांनी आता आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. गौरी, तू ज्या कारणामुळे हा निर्णय घेतला असेल, त्याला शिक्षा मिळेल, अगदी कुणी रक्ताचं असलं तरी, असे प्रशांत गडाख यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे.

पत्नी गौरी गडाख यांच्या मृत्यूला दोन महिने उटल्यानंतर प्रशांत गडाख यांनी फेसबूकवर एक दीर्घ पोस्ट लिहून या घटनेबाबत मन मोकळं केलं आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतात. ''माझ्या आयुष्यात घडलेल्या अत्यंत वेदनादायी प्रसंगात मला धीर देण्यासाठी, माझं सांत्वन करण्यासाठी, तुम्ही सगळे आला होतात. त्यात राजकीय विरोध असणारे पण वेदना जाणारेही होते.परंतु माझी मनस्थिती तेंव्हा कुणालाही भेटण्याची नव्हती.त्याबद्दल सॉरी... माझी स्थिती तुम्ही नक्कीच समजून घ्याल. नियतीने माझ्या वाट्याला मरुस्तपर्यंत जे वेदनेचं गाठोड दिलं आहे,ते मला घेऊनच चालावं लागेल. 'वर्तमान जगायचंय मला' ही माझी कविता जी इतरांना प्रेरणा होती ती अशा रीतीने माझीच प्रेरणा होऊन बसेल असं मला कधीच वाटलं नव्हतं.''

''राजकारणात, समाजकारणात, स्वतःच्या आयुष्यात यश-अपयश, कठीण प्रसंग खुप आले पण मी कधीही डगमगलो नाही. उलट त्यांना खंबीरपणे तोंड दिलं, लढलो... पण... गौरी तू मला हरवलं... माझा स्वभाव आलेल्या परिस्थितीशी लढण्याचा आहे,आता कुणाशी लढु..तु माझी पत्नी नव्हती तर आई, बहीण, मैत्रीण सगळं काही होती असं तुच मला म्हणायचीस ना.. तशीही तु मुडी होतीस, कधीकधी अचानक शांत राहायचीसं.. तु चेष्टेत मला म्हणायची कि, 'तुमच्याआधी मीच जाणार' पण तु अशी गेलीस की माझी आयुष्यभराची चेष्टा होऊन गेली. साहेबांची सगळ्यात आवडती सुन नाही तर तु मुलगी, आपल्या नेहल, दुर्वा आणि मी .. आमचं काय चुकलं गं.. रोज रात्री झोपताना असं तुझ्याशी भांडतो मी.. माझा आवाज पोहोचतो का गं तुझ्यापर्यंत'', असा भावूक सवाल त्यांनी दिवंगत पत्नीला गेला.

''मला कोणाचीही सहानुभूती नको आहे पण एक नक्की की माझा नियतीवर भरवसा आहे.ज्या कारणाने तु हा निर्णय घेतला असेल,त्याला शिक्षा नक्कीच मिळेल. अगदी कुणी रक्ताचं असलं तरी.. हा मला आत्मविश्वास आहे. गौरी मी घरी नव्हतो, तु निष्प्राण..आपल्या लहान मुलीने पाहिलं गं खिडकीतुन.. गौरी,तुला मी नेहमी म्हणायचो की, मी आहे तुझ्यामागे.. मी आता खरंच फकीर झालोय पण मला माझ्यासमोर माझ्या मुली,माझे वडील, माझ्यावर अवलंबून हजारो संसार दिसतात. मित्रांनो मी जरी तुमच्यात आलो तरी ही घटना मला एक दोन महिन्यात सावरू शकत नाही. प्लीज, माझी भावना तुम्ही समजून घ्याल. मी स्वतःहुन ठामपणे सांगायचो की, मी राजकारणात येणार नाही. पण माझ्या पत्नीच्या निधनात काहींनी राजकारण आणण्याचा प्रयत्न केला, आता काळच ठरवेल की मी राजकारणात यायचं कि नाही. पण माझ्या जिवलगांनो, तुम्ही मला जे बळ दिलं ते मी माझ्या आयुष्यभर विसरू शकत नाही. कारण माझ्या आयुष्यात माझ्या दोन्ही मुली, माझे आई-वडील आणि तुम्ही सर्व जिवलग मित्र आहात.आपण भेटु,तेंव्हा कृपा करून, माझं सांत्वन करू नका, न विसरता येणारी ती घटना मला निदान तुमच्यात असताना विसरायची आहे. जेंव्हा भेटु तेंव्हा तुमचे काम सांगा, समाजाची कामे सांगा, नवनिर्मितीची चर्चा करा.तुमच्याशी व्यक्त व्हावसं वाटलं म्हणुन हात मोकळा झाला आणि माझं मनही, असे ते म्हणाले.''

 

 

 

Web Title: "Gauri, the one who caused your death will definitely be punished, even if someone is relative." - Prashant Gadakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.