येरवडा चौकात मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करून अश्लील वर्तन करणारा गौरव आहुजा हा जवळपास १०-१२ तासांनी पोलिसांना शरण गेला आहे. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता. रात्रीपर्यंत त्याने प्रसारमाध्यमांना मुलाखत, एक व्हिडीओ जारी करून माफी मागितली आहे. यात तो शिंदे साहेबांचीही माफी मागत आहे. हे शिंदे साहेब कोण असा सवाल उपस्थित होत असतानाच आहुजा हा एवढ्या उशिराने आणि साताऱ्याला का पोलिसांना शरण गेला असा सवाल विचारला जात आहे.
काही महिन्यांपूर्वी बिल्डर बाळाने जेव्हा मध्यरात्री रस्त्यावर उत्पात माजविलेला तेव्हा त्याला मद्यधुंद असल्यापासून वाचविण्यासाठी पोलीस ठाण्यात मागच्या बाजुला बर्गर खायला दिला होता. त्याच्या शरीरातील दारू शोषली जाऊन तो दारुच्या अंमलात आहे असा रिपोर्ट येऊ नये म्हणून हे सर्व केले गेले होते. तसेच त्यानंतर त्याचे नमुनेही बदलले गेले होते. यात त्या बिल्डर बाळाच्या आईला अटक करण्यात आली होती. अशातच आता या आहुजालाही वाचविण्यासाठी आठ तासांपेक्षा जास्त वेळेची शक्कल लढविण्यात आल्याचे बोलले जात आहे.
गौरव आहुजा पोलिसांना तोपर्यंत शरण जाणार नाही जोपर्यंत त्याच्या शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण पूर्णतः नाहीसे होत नाही, असे आपचे नेते व या प्रकरणात उघडपणे बोलणारे विजय कुंभार यांनी म्हटले होते. कारमध्ये त्याच्यासोबत त्याचा मित्र भाग्येश ओसवाल देखील होता, त्याच्या हातात दारुची बाटली दिसत आहे. दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते आणि आहुजा हा गाडीही चालवत होता. तरीही या दोघांचा मेडिकल रिपोर्ट खूप महत्वाचा आहे. यात जर आहुजा मद्यधुंद होता हे सिद्ध झाले नाही तर त्याला मोठा फायदा मिळू शकतो. यामुळे त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न झाले असावेत अशी शंका आता पुणेकरांना येत आहे.
गौरव आहुजावर गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता. मोबाईल बंद होता, मग त्याची मुलाखत घेणाऱ्यांशी कसा संपर्क झाला. आहुजाने पुण्यात सरेंडर व्हायचे सोडून आठ-दहा तासांनी साताऱ्यात का सरेंडर केले, असे सवाल उपस्थित होत आहेत. गौरवच्या मेडिकलमध्ये आता अल्कोहोलचे हवे असलेले प्रमाण मिळेल का, असा सवालही पुणेकर विचारत आहेत. एकंदरीतच आहुजाला वाचविण्यासाठी ही सर्व खेळी रचली गेल्याचा संशय पुणेकरांनी व्यक्त केला आहे.