पुरस्काराच्या पैशांतून उभारले उद्यान

By Admin | Updated: May 7, 2017 06:25 IST2017-05-07T06:25:59+5:302017-05-07T06:25:59+5:30

स्वच्छ भारत अभियानामध्ये पुरस्कार मिळविलेल्या नवी मुंबई महापालिकेस यापूर्वी तीन वेळा संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाचा

Garden by award money | पुरस्काराच्या पैशांतून उभारले उद्यान

पुरस्काराच्या पैशांतून उभारले उद्यान

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानामध्ये पुरस्कार मिळविलेल्या नवी मुंबई महापालिकेस यापूर्वी तीन वेळा संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाचा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्काराच्या १ कोटी ५ लाख रुपयांतून नेरुळमधील टेकडीवर संत गाडगेबाबा उद्यान उभारण्यात आले असून, या उद्यानाला सहा वर्षांमध्ये तब्बल १० लाख ९८ हजार नागरिकांनी भेट दिली आहे.
महाराष्ट्र शासनाने २००२मध्ये संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान सुरू केले होते. पहिल्याच वर्षी नवी मुंबई महानगरपालिकेने प्रथम क्रमांक मिळविला. यासाठी सन्मानचिन्ह व ५० लाख रुपये बक्षीस प्राप्त झाले. २००५-६ या आर्थिक वर्षामध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेमध्येही महापालिकेने सहभाग घेतला व पुन्हा प्रथम क्रमांक मिळविला. यावर्षीही ५० लाख रुपयांचे बक्षीस पालिकेस मिळाले. २००८-९ या वर्षामध्येही ५ लाख रुपयांचा विशेष पुरस्कार पालिकेस देण्यात आला. पुरस्काराच्या माध्यमातून मिळालेल्या १ कोटी ५ लाख रुपये बक्षिसाच्या माध्यमातून संत गाडगेबाबा यांचे स्मारक व उद्यान उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. नेरुळ रेल्वेस्टेशन समोर आयुक्त निवासाच्या बाजूच्या ओसाड टेकडीची यासाठी निवड करण्यात आली. वर्षानुवर्षे कचराकुंडी बनलेल्या या भूखंडावर अत्यंत कमी खर्चामध्ये उद्यान उभारून त्याला संत गाडगेबाबा उद्यान नाव देण्यात आले. ११ जानेवारी २०११मध्ये उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. शहरवासीयांसाठी सर्वात मोठे व तिकीट आकारण्यात आलेले हे पहिले उद्यान ठरले. उद्यानामध्ये औषधी वनस्पती, वाद्य संस्कृती, आश्मयुगीन गुंफा, शेतकरी पुतळे उभारण्यात आले. आकर्षक बैठक व्यवस्था विस्तीर्ण जॉगिंग ट्रॅक व मुलांसाठी खेळण्यासाठी टॉयट्रेनसह इतर गोष्टींचा समावेश करण्यात आला. यामुळे बेलापूर ते ऐरोलीपर्यंतच्या नागरिक उद्यानाला भेट देऊ लागले. गाडगेबाबा उद्यानामध्ये सहा वर्षांमध्ये ५ ते १२ वर्षे वयोगटातील २ लाख ५८ हजार ४०७ नागरिकांनी भेट दिली आहे. १२ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ८ लाख ३८ हजार ९८८ नागरिकांनी भेट दिली आहे. उन्हाळ्याची सुटी असल्याने रोज १ हजारपेक्षा जास्त नागरिक उद्यानास भेट देत आहेत. उद्यानामध्ये संत गाडगेमहाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. नागरी स्वच्छता अभियानाच्या पुरस्कारामधून राज्यात उभारण्यात आलेले हे एकमेव उद्यान आहे. यामुळे पुरस्काराच्या पैशांचाही सदुपयोग झाला व ओसाड टेकडीचे चांगल्या उद्यानामध्ये रूपांतर होऊ शकले आहे.

कॅफेटेरिया बंदच

उद्यानामध्ये येणाऱ्या नागरिकांना खाद्यपदार्थ व इतर वस्तू खरेदी करता याव्या, यासाठी कॅफेटेरियासाठी बांधकाम केले आहे; परंतु प्रत्यक्षात सहा वर्षे झाल्यानंतरही ते सुरू करण्यात आलेले नाही. नागरिकांना पिण्यासाठी पाणीही घरून आणावे लागत असून उद्यानाच्या बाहेर जादा दराने खाद्यपदार्थ घ्यावे लागत आहेत. कॅफेटेरिया कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कमी खर्चात उभारले उद्यान

संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाचा पुरस्कार मिळाल्यानंतर त्या पैशांतून उद्यान विकसित करण्याचा निर्णय तत्कालीन आयुक्त विजय नाहटा व लोकप्रतिनिधींनी घेतला. शहर अभियंता मोहन डगावकर, तत्कालीन उपआयुक्त जगन्नाथ सिन्नकर यांनी परिश्रम घेऊन उद्यानाची उभारणी केली असून या माध्यमातून पुरस्काराच्या पैशांचा विनियोग कसा करावा, याविषयी आदर्श उदाहरण निर्माण केले आहे. शहरातील इतर उद्यानांच्या तुलनेमध्ये कमी खर्चात हे उद्यान उभारण्यात आले आहे.

खुले संग्रहालय उभारावे

उद्यानाचा भूखंड विस्तीर्ण आहे; परंतु येथे मुलांना खेळण्यासाठी पुरेशी साधनेच नाहीत. टॉय ट्रेन व इतर उद्यानांमध्ये असतात तेवढीच खेळणी येथेही आहेत वास्तविक येथे औषधी वनस्पती व त्यांचे गुणधर्म सांगणारे किंवा महापुरूषांची स्मारके उभारून त्यांची माहिती देणारे खुले संग्रहालय उभारणे शक्य असून पालिका प्रशासनाने विकासकामे करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Garden by award money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.