गणपत गायकवाडांनी पोलिस देत असलेले जेवण सोडले; कोणाला भेटू देत नसल्याने नाराज?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 19:09 IST2024-02-05T19:09:36+5:302024-02-05T19:09:55+5:30
गायकवाड यांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातच आता त्यांच्यावर जमीन मालकाला जातीवाचक शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीदेखील दाखल करण्यात आली आहे.

गणपत गायकवाडांनी पोलिस देत असलेले जेवण सोडले; कोणाला भेटू देत नसल्याने नाराज?
गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता. यामुळे गायकवाड यांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातच आता त्यांच्यावर जमीन मालकाला जातीवाचक शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीदेखील दाखल करण्यात आली आहे. अशातच गायकवाड यांना पोलीस पथकाशिवाय़ कोणाला भेटू दिले जात नसल्याने त्यांनी तुरुंगात असहकार पुकारला आहे.
गणपत गायकवाड तुरुंगात नाराज आहेत. यामुळे ते पोलीस देत असलेले जेवण घेत नाहीत, असे सुत्रांकडून एका वृत्तवाहिनीला सांगण्यात आले आहे. कुटुंबीयांना भेटायला दिले जात नसल्याने गायकवाड नाराज असल्याचे सांगितले जात आहे.
गायकवाडांनी पोलिसांच्या ताब्यात गेल्यापासून जेवणास नकार दिला आहे. पोलिसांनी विनंती केल्यानंतर त्यांनी फक्त चहा पिण्यास होकार दिला आहे. गणपत गायकवाड यांच्यासह त्यांच्या दोन साथीदारांना घरचे अन्न देण्यास मनाई आहे. यामुळे त्यांच्या जेवणाची सोय पोलिसांचे विशेष पथकच करत आहे. तसेच फक्त पथकच त्यांना भेटू शकत आहे. यामुळे गायकवाड नाराज आहेत, असे या सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, शिवसेना आणि भाजपात या गोळीबारावरून वाद सुरु झाले आहेत. गृहमंत्री फडणवीसांच्या भेटीला शिंदे गटाचे मंत्री नेते गेले होते. गायकवाडांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली होती. परंतु, भाजपाने अशी कारवाई पक्ष करतो, त्यासाठी समिती असते ती चौकशी करते, असे सांगत गायकवाडांवर कारवाई न करण्याचे संकेत दिले आहेत.