औसा (जि. लातूर) : मध्यरात्री विधवेवर सामूहिक बलात्कार करुन तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना शिवली येथे बुधवारी घडली़ पिडीत महिला १५ टक्के भाजली असून, लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्वोपचार रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत़ याप्रकरणी हणमंत आळणे (४२), समाधान पवार (२१) आणि गोविंद आळणे (२६) या नराधमांना पोलिसांनी अटक केली असून,तिघांनाही न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. औसा तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील २५ वर्षीय पिडित महिलेच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे ती शिवली येथे माहेरी राहते़ बुधवारी रात्री पिडीत महिला घरी एकटीच होती़ मध्यरात्री दीडच्या सुमारास ती घराबाहेर आली असताना तिघांनी तिला जबरीने दुचाकीवर बसवून शिवली शिवारातील जंगलात नेले़ तिघांनीही तिच्यावर अत्याचार केला. घटनेची कुठे वाच्यता होऊ नये म्हणून अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. त्यामुळे महिलेने आरडाओरड सुरू करताच तिघांनी पलायन केले़ ही आग विझवून पिडीत महिला घरी पोहोचली. गुरुवारी दिवसभर याची कुठेही वाच्यता झाली नाही. मात्र, रात्री पिडीत महिलेने धाडस करुन भादा पोलिसांत फिर्याद दिली. यावरुन गुरुवारी मध्यरात्री तीनही नराधमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला़ अवघ्या तीन तासांत पोलिसांनी तिघांच्याही मुसक्या आवळल्या़ औसा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एम. गादीया यांच्यासमोर शुक्रवारी हजर केले असता तिघांनाही नऊ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ हणमंत आळणे हा पिडीत महिलेच्या घराशेजारीच राहतो. अनेक दिवसांपासून तो तिच्यावर पाळत ठेवून होता. (प्रतिनिधी)गुन्हा दाखल होताच आरोपींना अटक गुन्हा दाखल होताच घटनेचे गांभीर्य ओळखून आम्ही तत्काळ आरोपींचा तपास सुरु केला. अवघ्या तीन तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्याचे उपविभागीय अधिकारी लता फड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सामूहिक बलात्कार करून विधवेला पेटविले
By admin | Updated: June 6, 2015 01:30 IST