रामपूरचे गणेश मंदिर सामाजिक ऐक्याचे प्रतीक
By Admin | Updated: September 10, 2016 02:58 IST2016-09-10T02:58:43+5:302016-09-10T02:58:43+5:30
घोलवड रेल्वे स्थानकाजवळ रामपूर प्लाटपाडा येथे श्री राम सिद्धी विनायक मंदिर आहे.

रामपूरचे गणेश मंदिर सामाजिक ऐक्याचे प्रतीक
डहाणू/बोर्डी : घोलवड रेल्वे स्थानकाजवळ रामपूर प्लाटपाडा येथे श्री राम सिद्धी विनायक मंदिर आहे. गणेश भक्तीच्या माध्यमातून पंचक्रोशीतील विविध जातीधर्मात ऐक्य निर्माण करण्यात या मंदिराचे कार्य अनन्यसाधारण आहे. येथे अकरा दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. येथील सामाजिक संदेश देणारे देखावे आणि चलचित्र पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी जमते.
डहाणू तालुक्यातील रामपूर गावच्या प्लाटपाडा येथे श्री रामसिद्धी विनायक मंदिर आहे. पश्चिम रेल्वेच्या घोलवड स्थानकाच्या पूर्वेला अर्ध्या किमी अंतरावर कोसबाड मार्गे डहाणू रस्त्यावर हे मंदिर आहे. माघ शुद्ध पंचमी शके १९२० संवत २०५५ ला मंदिर उभारण्यात आले. येथे बेचाळीस वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. परिसरात हिंदू धर्मातील माच्छी, आदिवासी, दुबळा, वाढवळ, भरवाड, पांचाळ समाजाप्रमाणेच जैन, ख्रिश्चन, मुसलमान, पारसी आणि इराणी धर्मियांची वस्ती आहे. स्थानिकांनी एकत्रित येऊन सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना केली.
सकाळी सात आणि सायंकाळी आठ वाजता आरती होते. नीरज विरकर या पुजाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. संकष्टी चतुर्थी गोपाळकाला, नवरात्रोत्सव इ. उत्सव साजरे केले जातात. माघ शुद्ध चतुर्थी व पंचमीला गणेश यज्ञाचे आयोजन करून पंचक्र ोशीतील नागरिकांना महाप्रसाद दिला जातो. चिखले गावातील सदानंद भजनी मंडळाकडून भजन-कीर्तन केले जाते. उत्सवकाळात फुलांची आरास आणि कडधान्याची रांगोळी डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या कलाकृती असतात. यंदा सामाजिक संदेश देणारे देखावे प्रसिद्ध असून या वर्षी भ्रष्टाचार निर्मूलनाचा संदेश देणारे चलचित्र साकारण्यात आले आहे. (वार्ताहर)
>सर्वधर्म समभाव अवतरला प्रत्यक्षात
बेचाळीस वर्षापूर्वी हा भाग दुर्गम होता. शिक्षणाचे प्रमाणही कमी होते. मात्र सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य निर्माण होऊन गावाने प्रगतीकडे वाटचाल केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तथापि मंदीर बांधण्याचा संकल्प करण्यात आला. गुलाबबेन मोहनलाल आणि किसन माच्छी यांनी मंदिराकरिता जमीन दान केली. लोकवर्गणी आणि श्रमदानातून मंदीर उभारण्याचे कार्य झाले. त्यामध्ये जालशेठ शामशेठ इराणी यांचे मोठे योगदान लाभले. फिरोज घटक इराणी यांनी पाया रचला तर, कै. सीताराम माच्छी, कै. दत्ता कांबळी, कै. कांतू मोहिते, चंदू कांबळी, ठाकूरभाई भरवाड आणि ग्रामस्थांनी मंदिराला कळस चढवल्याचे गावकरी सांगतात.