गांधीवादी, समाजवादी डॉ. जी. जी. पारीख यांचे १०२ व्या वर्षी निधन! स्वातंत्र्य चळवळीशी जोडलेला 'शेवटचा बुरूज' ढासळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 07:42 IST2025-10-03T07:41:47+5:302025-10-03T07:42:02+5:30
डॉक्टर जी. जी. पारीख यांच्या निधनामुळे स्वातंत्र्य आंदोलनाशी जोडलेला शेवटचा बुरूज ढासळला आहे. डॉ. पारीख समाजवादी आंदोलनाशी संबंधित कार्यकर्त्यांचे स्फूर्तीस्थान होते.

गांधीवादी, समाजवादी डॉ. जी. जी. पारीख यांचे १०२ व्या वर्षी निधन! स्वातंत्र्य चळवळीशी जोडलेला 'शेवटचा बुरूज' ढासळला
जयंत दिवाण
(गांधी विचारांचे कार्यकर्ते)
लोकमत न्यूज नेटवर्क
डॉक्टर जी. जी. पारीख यांच्या निधनामुळे स्वातंत्र्य आंदोलनाशी जोडलेला शेवटचा बुरूज ढासळला आहे. डॉ. पारीख समाजवादी आंदोलनाशी संबंधित कार्यकर्त्यांचे स्फूर्तीस्थान होते. पुरोगामी, समाजवादी, गांधीवादी, सर्वोदय या विचारधारेशी संबंधित कार्यकर्त्यांना एकत्र करून फॅसिस्ट सत्तेच्या विरोधात लढण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. डॉक्टर जी. जी. पारीख हे असे एक व्यक्तिमत्व होते ज्यांच्या भोवती सर्व विचारधारेचे लोक एकत्र येऊन काम करीत होते. मात्र आज हा दुवा निखळला आहे.
डॉक्टर जी. जी. पारीख राजकारणात असूही रचनात्मक कार्याला तेवढेच महत्त्व देत. गांधीवादी समाजवाद म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर जीजींच्या एकंदर आयुष्याच्या वाटचालीकडे आपल्याला पाहावे लागेल. जीजी यांनी सुमारे ७० वर्षांपूर्वी पनवेलजवळील तारा या ग्रामीण भागात केंद्राची स्थापना केली आणि त्याला नाव दिले युसुफ मेहरअली यांचे! ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आणि शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिले.
जी जी मेडिकल कॉलेजमध्ये असताना ४२ च्या चले जाव आंदोलनांत सक्रिय झाले व तुरुंगात ही गेले. समाजवादी पक्षाची स्थापना झाल्यानंतर ते समाजवादी राजकारणात उतरले; पण निवडणुकीच्या राजकारणात कधी पडले नाहीत. पक्षाच्या पदांच्या जबाबदाऱ्या त्यांनी घेतल्या. समाजवादी पक्ष विसर्जित झाल्यानंतर जनता पार्टी स्थापन झाली. त्यानंतर काही काळ ते मुंबई जनता पार्टीचे अध्यक्ष ही होते. आणीबाणीमध्ये ते तुरुंगात गेले. लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता या मूल्यांसाठी जे जे करता येईल ते ते त्यांनी करण्याचा प्रयत्न केला.
गांधी विचारांवर त्यांची मोठी निष्ठा होती. गांधींबद्दल अतोनात प्रेम होते. त्यासाठी गांधींच्या सेवाग्राम आश्रमातील गांधी कुटीची रिप्लीकेट त्यांनी बनविली. त्यांचे म्हणणे होते या कुटीमुळे लोकांना प्रेरणा मिळेल. प्रत्येकाला ते खादीचे महत्त्व सांगत व खादी उपयोगात आणण्याचा आग्रह करीत. लोकशाही टिकली पाहिजे व त्यासाठी कार्यकर्त्यांनी जेलमध्ये गेले पाहिजे हे ते प्रत्येकाला सांगत. जेलमध्ये कधी जाणार हा प्रश्न ते भेटणाऱ्याला नेहमीच विचारीत असत.
शंभरी ओलांडेपर्यंत ते लोकांच्या आधाराने चालत. पण त्यानंतर त्यांच्या पायांची शक्ती संपली व एकप्रकारे ते अंथरुणात खिळले. परंतु त्यांची स्मरणशक्ती शेवटपर्यंत शाबूत होती. संस्थेच्या कामात शेवटपर्यंत ते लक्ष घालत होते. त्यांच्यावर या दीर्घायुष्यात अनेक दुःखद प्रसंग आले. त्यांच्या पत्नी मंगला यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या तरुण जावयाचा मृ्त्यू झाला. पण त्यांनी ते दुःख कधी उगाळले नाही. सतत कामात व्यग्र राहिले.
काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाला ९० वर्ष पूर्ण झाली. या निमित्त पुण्यात संमेलन घेण्यात आले. या संमेलनाच्या पाठीशी प्रेरणा म्हणून स्वतः डॉक्टर जी जी होते. पक्ष राहिला नाही तरी विचार कालातीत आहे. या विचारांना घेऊन सतत एकत्र येऊन काम केले पाहिजे. यासाठीच त्यांनी या संमेलनाचा घाट घातला होता.
या संमेलनात ते येऊ शकले नाहीत. परंतु त्यांचे सर्व लक्ष संमेलनाच्या कार्यवाहीकडे होते हे विशेष. शेवटी १०२ वर्षांचे वय होऊन डॉक्टर जीजी गेले. राजकारणी, रचनात्मक कार्यकर्ता, स्वातंत्रसैनिक-अशा अनेक बिरुदावली मिरवणारा डोंगरा एवढा माणूस आपल्यातून गेला आहे.