वाचाल तर हसू रोखणे कठीण होईल : ही आहे गणपती स्पेशल 'पुणेरी पाटी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 18:52 IST2018-09-18T18:36:35+5:302018-09-18T18:52:47+5:30
संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या आणि पुणेकरांच्या हजरजबाबीपणाची पावती देणाऱ्या पुणेरी पाट्या आजही आवडीने वाचल्या जातात. याच स्वरूपातील एक पुणेरी पाटी सोशल मीडियावर हिट झाली आहे.

वाचाल तर हसू रोखणे कठीण होईल : ही आहे गणपती स्पेशल 'पुणेरी पाटी'
पुणे : संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या आणि पुणेकरांच्या हजरजबाबीपणाची पावती देणाऱ्या पुणेरी पाट्या आजही आवडीने वाचल्या जातात. याच स्वरूपातील एक पुणेरी पाटी सोशल मीडियावर हिट झाली आहे.
मानाच्या चौथ्या अर्थात तुळशीबाग गणपतीसमोर दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तांची रीघ लागली आहे. संपूर्ण राज्यभरातून मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी गर्दी होते. ही सर्व गणेश मंडळे जवळपासच्या अंतरावर असल्याने अनेकजण तुळशीबागेतील दुकानदारांना पत्ता विचारतात. गणपती काळात गौरी पूजन आणि हळदी-कुंकू असल्याने याकाळात तुळशीबाग ओसंडून वाहत असते. त्यामुळे अनेकदा पत्ते विचारणाऱ्यांचा कामात व्यत्यय येतो. अशावेळी थेट पत्ता विचारू नये अशी काहीशी उर्मट भाषा वापरण्यापेक्षा विक्रेत्यांनी विनोदी पाटी तयार केली आहे. त्यात 'कृपया कोणत्याही गणपतीचा पत्ता विचारू नये अन्यथा दोन मोदक द्यावे लागतील' असे लिहिले आहे. त्याही पलीकडे जात यात जे या पाटीचा फोटो त्यांना दोन मोदक अधिक द्यावे लागतील अशी सूचना आहे.
याबाबत विक्रेते रामलिंग यांनी माहिती देताना अशी पाटी दरवर्षी लिहीत असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर अनेकजण आवर्जून पाटीचा फोटो काढत असल्याचे त्यांनी सांगितले. पत्ता विचारू नये असे लिहिले असले तर पत्ता विचारणाऱ्याला व्यवस्थित पत्ता सांगत असून मोदक घेत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गर्दीत वैतागून आलेल्या भक्तांच्या चेहऱ्यावरचा 'मोद'च मोदकाचा आनंद देतो असेही ते म्हणाले.