RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 19:54 IST2025-07-01T19:52:43+5:302025-07-01T19:54:52+5:30
Maharashtra BJP State President Ravindra Chavan Political Career: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष असा रवींद्र चव्हाण यांचा प्रवास राहिला आहे.

RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
Maharashtra BJP State President Ravindra Chavan Political Career: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मर्जीतील रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून करण्यात आली. वरळी येथे झालेल्या जंगी कार्यक्रमात रवींद्र चव्हाणांचे नाव जाहीर करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्यासह प्रमुख भाजपा नेते उपस्थित होते. आगामी महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे.
प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी केंद्रीय भाजपाने केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांना पाठविले होते. रिजिजू यांच्या उपस्थितीत सोमवारी प्रदेश कार्यालयात निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यानंतर मंगळवारी वरळीत भव्य कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली. संघाचे स्वयंसेवक असलेल्या भाजपाचे नवीन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द कशी घडली? थोडक्यात पाहुया...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष
रवींद्र चव्हाण यांचा जन्म २० सप्टेंबर १९७० रोजी झाला. त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. २००२ मध्ये भाजपा युवा मोर्चाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. २००५ मध्ये ते कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. २००७ मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असतानाही भाजपा नगरसेवक असूनही स्थायी समितीचे सभापती झाले.
२००९ मध्ये रवींद्र चव्हाण यांना भाजपाने उमेदवारी दिली. त्यांनी तो विश्वास खरा करून दाखवला. ते २००९ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. यानंतर २०१४ मध्ये दुसऱ्यांदा आमदार म्हणून त्यांनी शपथ घेतली. यानंतर २०१५-१६ मध्ये कल्याण डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, ठाणे, पनवेल, महापालिकेत भाजपाचा बोलबाला पाहायला मिळाला. कर्जत, माथेरान, बदलापूरमध्ये भाजपाने चांगले यश मिळवले. यानंतर रवींद्र चव्हाण यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले. रवींद्र चव्हाण रायगड, पालघर पालकमंत्रीही होते.
२०१९ मध्ये तिसऱ्यांदा आमदार झाले. २०२१ मध्ये शिंदे-भाजपा सरकार आणण्यात रवींद्र चव्हाण यांचा मोलाचा वाटा होता, असे म्हटले जाते. यानंतर २०२१ मध्ये रविंद्र चव्हाणांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड करण्यात आली. सिंधूदुर्गचे पालकमंत्री म्हणूनही कारभार सांभाळला. २०२४मध्ये रवींद्र चव्हाण हे चौथ्यांदा डोंबिवली मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. ते आधी देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री, तर एकनाथ शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा प्रवास राहिला आहे.
रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यात महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली आहे. त्यांच्यावर आता भाजप पक्षाचा विस्तार करण्यासोबत पक्षशिस्त टिकवून ठेवण्याची जबाबदारी असणार आहे.