रस्त्यांवरील खड्ड्यांवरून राज ठाकरे आक्रमक, महाराष्ट्र सैनिकांना केलं असं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 18:26 IST2023-08-16T18:25:19+5:302023-08-16T18:26:06+5:30
Raj Thackeray: राज्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून महाराष्ट्र सैनिकांना महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे.

रस्त्यांवरील खड्ड्यांवरून राज ठाकरे आक्रमक, महाराष्ट्र सैनिकांना केलं असं आवाहन
यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर काही ठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांवरून राजकारणही तापलेलं आहे. दरम्यान, राज्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून महाराष्ट्र सैनिकांना महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे.
फेसबूकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणाले की, माझ्या महाराष्ट्र सैनिकांना माझं आवाहन आहे की, ह्या राज्यातील कोणताही महामार्ग असो की शहरातील अंतर्गत रस्ते असो, सर्वत्र खड्डेच खड्डे आहेत. तेंव्हा ह्या खड्ड्यांमध्ये झाडं लावा, किमान ह्यामुळे तरी प्रशासनाचं रस्त्यावरच्या खड्ड्यांकडे लक्ष जाईल, असं राज ठाकरे यांनी आपल्या आवाहनामध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, आज पनवेलमध्ये झालेल्या निर्धार मेळाव्यामध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून राज ठाकरे यांनी घणाघाती टीका केली. २००७ साली सुरु झालेला मुंबई गोवा महामार्गाच्या कामावर आजपर्यंत १५ हजार ५६६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. विशेष म्हणजे रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आजपर्यंत २५०० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.मात्र तरी देखील या रस्त्याचे काम अर्धवटच असुन जनतेने निवडणूक दिलेले लोकप्रतिनिधी करतात तरी काय ? असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी केला.