७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 21:06 IST2025-10-17T21:05:29+5:302025-10-17T21:06:07+5:30
MPSC व UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मौल्यवान संदर्भग्रंथदेखील ठेवण्यात येणार

७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबरमध्ये आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण केली. त्यांच्या 'पंचाहत्तरी'निमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक आगळावेगळा, लोकाभिमुख आणि संस्कारमूल्ये जपणारा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील प्रमुख ७५ एसटी बसस्थानकांवर मोफत 'वाचनालय' उभारून ज्ञान, साहित्य आणि संस्कृतीचा दिवा जनतेसाठी प्रज्वलित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या ३०९ व्या संचालक मंडळाच्या बैठकीत या निर्णयाची घोषणा करण्यात आली. या बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, तसेच उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर उपस्थित होते.
मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आणि ज्येष्ठ नेते विनय सहस्रबुद्धे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आकाराला आला आहे. मोदीजींच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्वसामान्य नागरिकांसाठी ‘मोफत खुले वाचनालय’ उभारण्यात येणार आहे. या वाचनालयांमध्ये वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, नामदेव ढसाळ, व. पु. काळे, विश्वास पाटील अशा नामवंत साहित्यिकांच्या कृती उपलब्ध असतील. तसेच MPSC व UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मौल्यवान संदर्भग्रंथदेखील ठेवण्यात येतील.
हा 'वाचन कट्टा' मराठी भाषेचा समृद्ध वारसा जपणारा ठरेल आणि समाजात वाचन संस्कृतीचा नवा सुवर्णप्रकाश पसरवेल, असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तरी निमित्त आम्ही जनतेसाठी ज्ञानाची ही ‘अनमोल भेट’ देत आहोत. वाचन संस्कृती आणि मराठी साहित्याचा प्रचार हा आमचा लोकाभिमुख उपक्रम आहे.
- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री