Maharashtra Politics: फडणवीसांच्या ‘त्या’ आरोपांवर वळसे-पाटलांचे भाष्य; म्हणाले, “तेव्हाच्या सरकारचा प्रयत्न...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 16:11 IST2023-01-24T16:10:39+5:302023-01-24T16:11:09+5:30
Maharashtra News: ठाकरे सरकारने मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट संजय पांडेंना दिले होते, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Maharashtra Politics: फडणवीसांच्या ‘त्या’ आरोपांवर वळसे-पाटलांचे भाष्य; म्हणाले, “तेव्हाच्या सरकारचा प्रयत्न...”
Maharashtra Politics: महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपल्याला तुरुंगात टाकण्याचे टार्गेत तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिले गेले होते, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्सस्फोटावर भाष्य केले आहे.
एबीपी माझाने आयोजित केलेल्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. उद्धवजींनीच माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले. माझे आजही त्यांच्याशी कोणतेही वैर नाही. मनात कोणतीही कटुता नाही. पण पाच वर्ष ज्यांच्यासोबत काम केले. त्यांनी माझा एक फोनही उचलला नाही. त्यांनी सौजन्य म्हणूनही माझ्याशी बोलणे योग्य समजले नाही. उलट गेल्या अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यावर वेगवेगळ्या केसेस कशा टाकता येतील यासाठीचे प्रयत्न झाले. कुठल्याही परिस्थितीत याला अडकवा, आत टाका असे टार्गेटच तत्कालीन सीपी संजय पांडे यांना देण्यात आले होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. यावर दिलीप वळसे-पाटील यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली.
देवेंद्र फडणवीसांचे आरोप दिलीप वळसे-पाटील यांनी फेटाळले
देवेंद्र फडणवीस नेमके काय बोलले हे मी ऐकलेले नाही. मात्र, त्यांनी जो आरोप केला आहे, तसा कोणताही प्रयत्न महाविकास आघाडीच्या काळात झाला नाही. फडणवीस हे त्यांना असलेल्या माहितीच्या आधारे बोलले असतील. मात्र, मला जी माहिती आहे, त्यानुसार तेव्हाच्या राज्य सरकारने असा कोणताही प्रयत्न केला नव्हता, असे दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"