नाशिकमधला मोठा नेता पक्षाची साथ सोडणार?; शिंदेंनंतर आता भाजपाचा उद्धव ठाकरेंना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 12:47 IST2025-02-25T12:35:09+5:302025-02-25T12:47:09+5:30
विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून उद्धव ठाकरे गटाला गळती लागल्याचं चित्र समोर आले.

नाशिकमधला मोठा नेता पक्षाची साथ सोडणार?; शिंदेंनंतर आता भाजपाचा उद्धव ठाकरेंना धक्का
नाशिक - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता भाजपा उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. माजी आमदार अनिल कदम लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची बातमी माध्यमात पुढे आली आहे. अनिल कदम हे निफाडचे आमदार असून मागील २ निवडणुकीत त्यांनी सलग विजय मिळवला होता. अनिल कदम कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करणार आहे. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला फटका बसला. २०१९ च्या निवडणुकीत ५६ जागा निवडून आणणाऱ्या उद्धव ठाकरेंना यंदाच्या निवडणुकीत केवळ २० जागांवर समाधान मानावे लागले.
विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून उद्धव ठाकरे गटाला गळती लागल्याचं चित्र समोर आले. त्यात अनेक माजी आमदार, नगरसेवक, पदाधिकारी पक्षाची साथ सोडून इतर पक्षात जाताना दिसून येतात. त्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ठाकरे गटाला वारंवार धक्के देण्यात येतायेत. आता भाजपानेही ठाकरे गटाला धक्का देण्याची तयारी केली आहे. निफाडचे माजी आमदार अनिल कदम हे त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असं बोललं जात आहे.
मात्र मी माझ्या प्रशासकीय कामानिमित्त मुंबई येथे आलो आहे. माझा कुठलाही पक्ष प्रवेश नसून, काही प्रसार माद्यमातून चुकीची बातमी पसरवली जात आहे त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये असं सांगत माजी आमदार अनिल कदम यांनी भाजपा प्रवेशाच्या वृत्ताचं खंडन केले आहे.
कोण आहेत अनिल कदम?
अनिल कदम हे २००९ आणि २०१४ साली निफाड विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले होते. ते शिवसेनेचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जातात. २०२२ साली एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंशी फारकत घेतली तरीही अनिल कदम ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले. निफाड तालुक्यात त्यांचा जनसंपर्क मोठा असून सुशिक्षित नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. परंतु अनिल कदम यांना त्यांच्या घरातूनच आव्हान आहे. चुलत बंधू यतीन कदम हे त्यांचे विरोधक मानले जातात.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनिल कदम यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिलीप बनकर विजयी झाले. २००९ साली शिवसेनेच्या अनिल कदमांना ९० हजार ६५ मते तर राष्ट्रवादीच्या दिलीप बनकर यांना ५६ हजार ९२० मते पडली होती. २०१४ मध्येही कदमविरुद्ध बनकर सामना झाला. त्यात अनिल कदमांना ७८ हजार १८६ मते तर दिलीप बनकर यांना ७४ हजार २६५ मते मिळाली. या निवडणुकीत बनकर केवळ ३ हजार मतांनी पराभूत झाले. परंतु २०१९ च्या निवडणुकीत दिलीप बनकरांना ९६ हजार ३५४ मते तर अनिल कदमांना ७८ हजार ६८६ मते पडली होती. या निवडणुकीत अनिल कदम यांचा पराभव झाला होता.