लोकसभेच्या निकालानंतर भाजपला मोठा धक्का; माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांचा पक्षाला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 06:27 PM2024-06-22T18:27:15+5:302024-06-22T18:53:57+5:30

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला हिंगोली आणि नांदेडमध्ये मोठा फटका बसला आहे.

Former minister Suryakanta Patil resigned from the Bharatiya Janata Party membership | लोकसभेच्या निकालानंतर भाजपला मोठा धक्का; माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांचा पक्षाला रामराम

लोकसभेच्या निकालानंतर भाजपला मोठा धक्का; माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांचा पक्षाला रामराम

Suryakanta Patil : माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि हिंगोली लोकसभेच्या माजी खासदार सूर्यकांता पाटील यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला आहे. सूर्यकांता पाटील यांनी  पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच हदगाव विधानसभा संयोजक पदाचा राजीनामा दिला आहे. सूर्यकांता पाटील यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला हिंगोली व नांदेड जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. सूर्यकांता पाटील यांनी त्यांचा राजीनामा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.किशोर देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला. गेल्या अनेक दिवसांपासून सूर्यकांता पाटील यांनी आपली परखड मते व्यक्त केली होती. त्यानंतर आता पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

सूर्यकांता पाटील यांनी चार वेळा खासदार, एक वेळा आमदार म्हणून हिंगोली-नांदेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. आपण आपला राजीनामा स्वखुशीने देत असल्याचे सूर्यकांता यांनी स्पष्ट केलं आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर सूर्यकांता पाटील यांनी परखड मत व्यक्त केले होते. अशोक चव्हाणांमुळे भाजपाचा पराभव झाला नाही. उलट भाजपत येऊन अशोक चव्हाण यांनी स्वतःच नुकसान करून घेतलं, असे विधान पाटील यांनी केलं होतं.

काय म्हटलंय राजीनामा पत्रात?

'मी माझ्या प्राथमिक सदस्यत्वाचा तथा माझ्या हदगाव विधानसभा संयोजक पदाचा राजीनामा देत आहे. आपल्या सोबत गेल्या १० वर्षात खूप काही शिकता आले. तालुक्यात बुथ कमीटीपर्यंत काम केले. आपण दिलेल्या संधीसाठी मी आपली व भारतीय जनता पार्टीची अत्यंत आभारी आहे. मी आपला निरोप घेत आहे. प्रत्यक्ष भेटीचा प्रयत्न केला पण आपल्या व्यस्ततेमुळे ते शक्य झाले नाही. कोणतीही कटुता मनात न ठेवता राजीनामा देत आहे तो स्विकारावा हि नम्र विनंती' असे या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.

१९७२ मध्ये भाजप महिला आघाडी प्रमुख म्हणून सूर्यकांता पाटील यांनी त्यांचा राजकीय प्रवास सुरु केला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन नगरसेवक ते खासदार अशी पदे भूषवली. त्यानंतर पाटील या राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्या. यानंतर २०१४ साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. नांदेड लोकसभा मतदारसंघातून सूर्यकांता पाटील यांनी निवडणूक लढविली होती. त्यानंतर हदगाव विधानसभा मतदारसंघातही त्यांनी निवडणूक लढविली होती. त्यानंतर त्या केंद्रात ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले.

Web Title: Former minister Suryakanta Patil resigned from the Bharatiya Janata Party membership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.