उल्हासनगरात १८ लाखाची विदेशी दारू जप्त, राज्य उत्पादन विभागाची रेल्वे ऐजेंटच्या घरी धाड, तिघांना अटक
By सदानंद नाईक | Updated: May 31, 2025 18:45 IST2025-05-31T18:43:30+5:302025-05-31T18:45:13+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका तिकीट एजंटच्या घरी धाड टाकली.

उल्हासनगरात १८ लाखाची विदेशी दारू जप्त, राज्य उत्पादन विभागाची रेल्वे ऐजेंटच्या घरी धाड, तिघांना अटक
सदानंद नाईक, उल्हासनगर: राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका तिकीट एजंटच्या घरी धाड टाकून राज्यात विक्रीस मनाई असलेला विदेशी स्कॉच दारूचा १८ लाख ६३ हजार रुपये किंमतीचा साठा जप्त केला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक झाली.
उल्हासनगर कॅम्प नं-१, येथील रेल्वे तिकिटांचा एजंट विदेशी उच्च प्रतीची स्कॉच दारूची अवैधपणे विक्री करीत असल्याची माहिती कल्याण राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. विभागाच्या पथकाने उल्हासनगर पोलिसाच्या मदतीने तिकीट एजंट अरुण पोपटानी याच्या डायमंड हॉलीडेज ऑफिसवर २८ मे रोजी धाड टाकून उच्च प्रतीचे विदेशी स्कॉच दारूच्या बॉटल जप्त करून पोपटानीला अटक केली. कल्याण, उल्हासनगर व अंबरनाथ येथून एकूण १८ लाख ६३ हजार रुपयाची उच्च प्रतीचे विदेशी स्कॉचचा साठा विभागाने जप्त केला. तिकिट एजंट पोपटानीसह अन्य दोन जणाला उत्पादन शुल्क पथकाने बेड्या ठोकल्या असून याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखला झाला. तिन्ही आरोपीला कल्याण सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
शहरांत रेल्वे व विमान तिकिटांचे व्यवहार करणारा पोपटानी चक्क दिल्ली व परराज्यातून उच्च प्रतीचे विदेशी स्कॉचची तस्करी करून हायप्रोफाईल सोसायट्यांमध्ये विक्री करीत असल्याचे तपासात उघड झाले. पोपटानी याला त्याचे साथीदार सुरज शुक्ला व दिपक नंनकानी हे मदत करीत असल्याचे उघड झाले. पोपटानीने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या राहत्या घरात, इमारतीच्या पंपहाऊस आणि अंबरनाथमधील आणेगाव येथे छापे टाकण्यात आले. तसेच साथीदार सुरज श्रीकौशल शुक्ला व दिपक राजकुमार नंनकानी सुद्धा मोठ्या प्रमाणात विदेशी दारू साठवून ठेवत होते. एकूण ३५२ स्कॉचच्या सिलबंद बाटल्या विविध ब्रॅन्ड्ससह जप्त करण्यात आल्या. तसेच दोन वाहनेही ताब्यात घेतली.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार आणि अधीक्षक प्रविण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक परब त्यांच्या पथकाने कारवाई केली. तर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.