बेस्टचा प्रवासी संख्या वाढवण्यावर भर
By Admin | Updated: June 10, 2016 01:56 IST2016-06-10T01:56:21+5:302016-06-10T01:56:21+5:30
बेस्टच्या तिकीट भाड्यात वाढ होत असल्याने मुंबईकरांनी आपला काहीसा रोख रिक्षा, टॅक्सी, लोकल आणि मेट्रोकडे वळवला आहे.

बेस्टचा प्रवासी संख्या वाढवण्यावर भर
मुंबई : बेस्टच्या तिकीट भाड्यात वाढ होत असल्याने मुंबईकरांनी आपला काहीसा रोख रिक्षा, टॅक्सी, लोकल आणि मेट्रोकडे वळवला आहे. अशातच बेस्ट प्रवाशांची संख्या वाढावी, त्यांच्या समस्या जाणून घेता याव्यात म्हणून बेस्टने ‘प्रवाशांशी थेट भेट’ हे अभियानच हाती घेतले आहे. या अभियानाच्या माध्यमातून प्रवाशांच्या अडचणींसह सूचनांची नोंद घेण्यात येणार आहे.
बेस्ट प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या मनात उपक्रमाच्या बससेवेबद्दल विश्वास निर्माण करून बेस्टचे उत्पन्न आणि प्रवासी वाढवण्यासाठी ‘प्रवाशांशी थेट भेट’ हे प्रवासी संपर्क अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत १२ जून रोजी बेस्ट उपक्रमाच्या मध्य उपनगर विभागातील धारावी, काळा किल्ला, कुर्ला, मरोळ, मजास, दिंडोशी आणि मागाठणे या आगारांचे आगार व्यवस्थापक व वरिष्ठ अधिकारी सकाळी ११ वाजता आगारांमध्ये उपस्थित राहत प्रवाशांशी संवाद साधणार आहेत. या वेळी बससेवेसंबंधातील प्रवाशांच्या अडचणी आणि सूचनांची नोंद घेण्यात येणार आहे. शिवाय बससेवेचा स्तर सुधारण्यासाठी आणि प्रवासी उत्पन्नात वाढ करण्यासाठी बसप्रवाशांकडून सूचना स्वीकारण्यात येणार आहेत.