कोकण रेल्वे मार्गात पाच नवीन प्रकल्प
By Admin | Updated: April 8, 2017 03:35 IST2017-04-08T03:35:43+5:302017-04-08T03:35:43+5:30
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने कोकण रेल्वेच्या अधिकृत शेअर समभाग (कर्जरोखे) भांडवलामध्ये ८०६.४७ कोटी रुपयांवरून ४,०००कोटी रुपये इतकी वाढ करण्यास मंजुरी दिली

कोकण रेल्वे मार्गात पाच नवीन प्रकल्प
नवी मुंबई : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने कोकण रेल्वेच्या अधिकृत शेअर समभाग (कर्जरोखे) भांडवलामध्ये ८०६.४७ कोटी रुपयांवरून ४,०००कोटी रुपये इतकी वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. कोकण रेल्वेतर्फे १०,००० कोटी रु पये खर्चाचे पाच प्रकल्प उभारण्यात येत आहेत. या प्रकल्पांमध्ये रोहा-वीर मार्गाचे दुपदरीकरण, कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण, कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी क्षमतेचे दुपटीकरण, चिपळूण-कराड रेल्वे मार्ग उभारणी आणि नवीन क्रॉसिंग स्टेशनांची निर्मिती या प्रकल्पांचा समावेश आहे. हे प्रकल्प येत्या पाच वर्षांत पूर्ण होणार आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिले.
रोहा-वीर मार्गाचे दुपदरीकरण करण्याचे काम सुरू झाले असून, या कामासाठी ३४० कोटी रु पये खर्च येणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन कटिबद्ध असून, कोकण रेल्वेमार्गावरील रेल्वे रु ळांची वाढ करण्याबरोबरच रेल्वेमार्गावर नवीन ११ रेल्वे स्थानके उभारण्यात येत आहेत. त्यापैकी नऊ रेल्वे स्टेशन महाराष्ट्र राज्यात, तर दोन कर्नाटक राज्यात उभारण्यात येणार आहेत. कोकण रेल्वेतर्फे ३२०कोटी रु पये खर्चून चिपळूण-कराड रेल्वेमार्ग उभारण्यात येत आहे. कोकण रेल्वेमध्ये केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचा ५१ टक्के, महाराष्ट्र सरकारचा २१टक्के, कर्नाटक सरकारचा १६टक्के, गोवा आणि केरळ सरकारचा प्रत्येकी ६ टक्के वाटा आहे, असे गुप्ता यांनी सांगितले. १९९० पासून कोकण रेल्वेतर्फे रोहा ते बंगळुरू (मंगलुरू) या दरम्यानच्या ७४० किलोमीटर मार्गावर रेल्वे गाड्या चालविण्यात येत आहेत. कोकण रेल्वेने गेल्या २६ वर्षांत प्रगतीची अनेक शिखरे गाठली असली, तरी आर्थिक निधी अभावी अपेक्षित विकासाची गती राखण्यात कोकण रेल्वेला यश आले नाहे. त्याचा परिणाम कोकण रेल्वेच्या उत्पन्नावर झाला आहे. कोकण रेल्वेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शेअर रोखेद्वारे भांडवल उभे करण्यास कोकण रेल्वेला हिरवा कंदील दाखविला आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील हॉल्ट स्टेशनांचे रूपांतर एक क्र ॉसिंग स्टेशनांमध्ये करण्याचे, तसेच मार्ग दुहेरीकरण करण्याचे काम सुरू आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास आरामदाई होणार आहे. कोकण रेल्वेतर्फे उभारण्यात येणाऱ्या नवीन पाच प्रकल्पांसाठी लागणाऱ्या १० हजार कोटी रकमेपैकी ३०५०कोटी रु पये कर्ज रोख्यांच्या माध्यमातून आणि उर्वरित रक्कम कर्जाद्वारे उभारण्यात येणार आहे. २०१७-१७ या वर्षात कोकण रेल्वेला रो-रो सेवेतून५७कोटी रु पये इतके उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती संजय गुप्ता यांनी दिली. यावेळी कोकण रेल्वेचे संचालक राजेंद्र कुमार, अमिताभ बॅनर्जी, मुख्य जनसंपर्क अधिकारी एल.के.वर्मा, आदी उपस्थित होते.
>कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण
येत्या अडीच वर्षांत संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण होणार असून ‘कोरे’ला मिळालेल्या पुंजीतून विकासात्मक कामे हाती घेतली जाणार आहेत. या कामाची टेंडर प्रोसेस पूर्ण झाली असून महिनाभरात कामाला सुरुवात केली जाणार आहे. यामुळे रेल्वेसेवेतील वक्तशीरपणा वाढणार असून इंधन बचत होणार असल्याची माहिती कोकण रेल्वेने दिली.