आर्थिक फसवणुकीचीही चौकशी केली जाईल; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, विधिमंडळात पडसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 14:16 IST2023-08-04T14:15:16+5:302023-08-04T14:16:15+5:30
भाजपचे आशिष शेलार यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे हा विषय उपस्थित केला.

आर्थिक फसवणुकीचीही चौकशी केली जाईल; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, विधिमंडळात पडसाद
मुंबई : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आर्थिक फसवणुकीचाही अँगल होता का याची चौकशी नक्कीच केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिले.
भाजपचे आशिष शेलार यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे हा विषय उपस्थित केला. ते म्हणाले की, नितीन चंद्रकांत देसाई यांनी एनडी स्टुडिओवर १८० कोटींचे कर्ज काढले होते. या १८० कोटींचे २५२ कोटी झाले. या प्रकरणातून रशेष शाह नामक व्यक्ती आणि ‘एआरसी एडेलव्हाइस’ कंपनीच्या सावकारी पद्धतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे केवळ अपघाती मृत्यू म्हणून या प्रकरणाची चौकशी न करता या कंपनीच्या व्याजाचा दर, व्याज वृद्धीचा दर, वसुलीची पद्धत या सर्व कार्यपद्धतीची विशेष टीम नेमून चौकशी करावी. या कंपन्या आधुनिक सावकार असून त्यांची अन्य दोन प्रकरणांची माहिती आपल्याकडे असून तीही गृहमंत्र्यांकडे देणार असल्याचे शेलार म्हणाले.
काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य अशोक चव्हाण यांनी देसाई यांच्या कथित आर्थिक फसवणुकीची चौकशी सरकारने करावीच, पण त्यांनी उभा केलेला भव्यदिव्य स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा, अशी मागणी केली. यावर गृहमंत्री फडणवीस यांनी देसाई यांनी आत्महत्या का केली याची चौकशी करताना त्यांची आर्थिकदृष्ट्या कोणी फसवणूक केली का, याची चौकशी केली जाईल. स्टुडिओ ताब्यात घेण्यासंदर्भात कायदेशीर बाजू तपासून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.