वित्तमंत्र्यांच्या कार्यालयाला आयएसओ मानांकन!

By admin | Published: June 30, 2017 01:15 AM2017-06-30T01:15:50+5:302017-06-30T01:15:50+5:30

कामाच्या तक्रारी घेऊन राज्यभरातून मंत्री कार्यालयासमोर गर्दी करणारे नागरिक आणि त्यांच्याकडे तुच्छतेने पहात, टोलवाटोलवी

Finance Minister's office is ISO number! | वित्तमंत्र्यांच्या कार्यालयाला आयएसओ मानांकन!

वित्तमंत्र्यांच्या कार्यालयाला आयएसओ मानांकन!

Next

अतुल कुलकर्णी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कामाच्या तक्रारी घेऊन राज्यभरातून मंत्री कार्यालयासमोर गर्दी करणारे नागरिक आणि त्यांच्याकडे तुच्छतेने पहात, टोलवाटोलवी करणारे मंत्र्यांच्या कार्यालयातले कर्मचारी हे चित्र मंत्रालयाला नवे नाही. मात्र याला छेद देत गुरुवारी मंत्री कार्यालयाची प्रतिमा बदलणाऱ्या तीन आश्चर्यकारक गोष्टी घडल्या. वित्त व नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाला आय.एस.ओ. मानांकन मिळाले, असे मानांकन मिळविणारे हे देशातले पहिले मंत्री कार्यालय ठरले आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस खादी वापरली पाहिजे, या आदेशाची अंमलबजावणी करणारे म्हणूनही वित्त मंत्र्यांचे कार्यालय देशातले पहिले कार्यालय ठरले. मुनगंटीवार यांच्या कार्यालयातले सगळे अधिकारी, कर्मचारी खादीचा एकच गणवेश घालून होते. तिसरी गोष्ट घडली ती राजशिष्टाचाराचे सगळे संकेत बाजूला सारून राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा मुख्यमंत्री स्वत: वित्तमंत्र्यांच्या दालनात गेले व मुनगंटीवार यांच्यासह त्यांच्या कार्यालयीन सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना शुभेच्छा देत त्यांचे कौतुकही केले.
एखाद्या लग्नघरासारखे मंत्री कार्यालय सजले होते. सगळे कर्मचारी, अधिकारी एकाच रंगाचे खादीचे जॅकेट घालून आले होते. ४ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प सोडणाऱ्या वनमंत्र्यांच्या कार्यालयातील सगळ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी ‘ग्रीन आर्मी’ योजनेत स्वत:ची नोंदणी करून घेतली आणि आयएसओ प्रमाणपत्र मिळवले. हे तीनही कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुनगंटीवार यांच्या कार्यालयात पार पडले.
आयएसओ मानांकन का घेतले, याची अत्यंत सुरस माहिती यावेळी वित्तमंत्र्यांनी सांगितली. वन विभागाला आधी ९९ व नंतर ३३ असे एकून १३२ पथदर्शी मुद्दे ५ वर्षांकरीता देण्यात आले. यामध्ये ‘प्रशासकीय सुधारणा’ या एकाच मुद्दाच्या अनुषंगाने वन विभागाच्या सर्व कार्यालयांना आयएसओ मानांकन घेण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले. हे उद्दीष्ट क्षेत्रीय कार्यालयापुरते मर्यादित असताना इतरांनाही प्रेरणादायी ठरावे म्हणून मंत्री कार्यालय सुद्धा आयएसओ प्रमाणित करण्याचे ठरवले गेले आणि ते प्रमाणपत्रही आम्ही मिळवले, असे त्यांनी यावेळी सांगितले.
बांबूपासून तयार करण्यात आलेली तलवार, वनौषधी संदर्भातील माहिती पुस्तिका व रोप देऊन सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. कार्यक्रमाला सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार, वनविभागाचे सचिव विकास खारगे, आयएसओ यंत्रणेचे प्रमुख शशिनाथ मिश्रा, नरेंद्र गंगाखेडकर, माजी आमदार अतुल शहा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
वित्तमंत्र्यांच्या कार्यालयात कोणतेही पत्र द्या किंवा मंत्र्यांना मेसेज करा, त्याचाही पाठपुरावा केला जातो आणि त्याची नोंद आढळते असे यावेळी कार्यालयातील विशेष कार्यअधिकारी महेश शेवाळे यांनी सांगितले. त्यांनीच या कार्यक्रमाचे संचलनही केले.

Web Title: Finance Minister's office is ISO number!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.