अखेर रखडलेल्या कामांना सुरुवात; घोडबंदर भागातील आदिवासी पाड्यांत सहा महिन्यांत पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 06:19 IST2025-02-15T06:19:30+5:302025-02-15T06:19:47+5:30

तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांच्या कार्यकाळात ८८ लाखांचा खर्च करण्याची निविदा मंजूर करण्यात आली होती. मात्र, दोन वर्षे त्या कामाचे कार्यादेश दिले नव्हते.

Finally, the stalled work begins; Water supply to tribal padas in Ghodbunder area within six months | अखेर रखडलेल्या कामांना सुरुवात; घोडबंदर भागातील आदिवासी पाड्यांत सहा महिन्यांत पाणीपुरवठा

अखेर रखडलेल्या कामांना सुरुवात; घोडबंदर भागातील आदिवासी पाड्यांत सहा महिन्यांत पाणीपुरवठा

अजित मांडके 

ठाणे : घोडबंदर भागातील पानखंडा, देवाचा पाडा, बमनाली पाड्यासह येथील आदिवासी पाड्यांत दोन वर्षांपूर्वी येथे जलवाहिनी टाकण्याचे, पाण्याच्या टाक्या उभारण्याचे नियोजन आखण्यात आले होते. ‘लोकमत’मध्ये याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच ठाणे पालिकेने उशिराने का होईना या कामाचे कार्यादेश दिले.  त्यानुसार या कामाला सुरुवातही झाली आहे. पुढील सहा महिन्यांत पाड्यांमधील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार आहे.

घोडबंदर भागातील पानखंडा आणि त्याच्या आजूबाजूच्या आदिवासी पाड्यांतील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन अगदी डोंगरमाथ्यावर जाऊन अरुंद वाटा तुडवत पाणी आणावे लागत असल्याचे विदारक चित्र ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच, पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याची दखल घेतली. त्यानुसार आता येथील आदिवासींची तहान भागविण्यासाठी त्यांनी पावले उचलली आहेत. त्यातही तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांच्या कार्यकाळात ८८ लाखांचा खर्च करण्याची निविदा मंजूर करण्यात आली होती. मात्र, दोन वर्षे त्या कामाचे कार्यादेश दिले नव्हते, परंतु आता रखडलेल्या कामाचे कार्यादेश दिले असून, त्याचे कामही सुरू केल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे.

ही कामे होणार
१० ठिकाणी सिंटेकच्या ५ हजार लीटरच्या टाक्या बसविल्या जाणार आहेत. त्यात कशेळी पाडा, पानखंडा, बमनाली पाडा, टाकरडा पाडा आदींसह इतर आदिवासी पाड्यांचा समावेश आहे. तसेच, येथील सर्व पाड्यांना पाणी मिळावे या उद्देशाने ३ ते ४ ठिकाणी पंप बसविले जाणार आहेत. ३ ते ४ इंचाची जलवाहिनीसुद्धा टाकली जाणार आहे. त्यानुसार पुढील सहा महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे. 

अधिकाऱ्यांकडून पाहणी
पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी  येथील पानखंडा व इतर आदिवासी पाड्यांची बुधवारी पाहणी केली. यावेळी सिंटेकच्या टाक्या काही ठिकाणी तुटलेल्या आढळून आल्या. बोअरवेलला गढूळ पाणी येत असल्याचेही त्यांच्या निर्दशनास आले. तुटलेल्या टाक्या बदलल्या जाणार असून, इतर समस्या सोडविण्याची ग्वाही दिली. 

Web Title: Finally, the stalled work begins; Water supply to tribal padas in Ghodbunder area within six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.