अखेर २ महिन्यांनी मंत्र्यांना पीए, पीएस मिळाले; मुख्यमंत्र्यांनी मनमानीला लावला चाप
By यदू जोशी | Updated: February 12, 2025 07:40 IST2025-02-12T07:39:41+5:302025-02-12T07:40:00+5:30
आपल्याला पीए, पीएस मिळत नसल्याने कामच करता येत नाही असे म्हणत तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांनी आपापल्या मर्जीतील नावे रेटली, पण त्यातील अनेक नावांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कात्री लावली आहे

अखेर २ महिन्यांनी मंत्र्यांना पीए, पीएस मिळाले; मुख्यमंत्र्यांनी मनमानीला लावला चाप
यदु जोशी
मुंबई - मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर जवळपास दोन महिन्यांनी बहुतेक मंत्र्यांना पीए, पीएस, ओएसडी मिळाले आहेत, पण बरेच मंत्री असे आहेत की, ज्यांनी शिफारस केलेली नावे पूर्णपणे मंजूर न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनमानीला चाप लावला.
११ कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांकडील स्टाफला मंजुरी देणारा आदेश मंगळवारी काढण्यात आला. त्याआधी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत, ‘आपल्या मंत्रिकार्यालयाला स्टाफच नाही’ अशी ओरड विशेषत: शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी केली. याआधी पाच वेगवेगळे आदेश काढून पीए, पीएस, ओएसडी नेमण्यात आले होते.
महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडे असलेल्यांना घ्यायचे नाही, ज्यांचे रेकॉर्ड चांगला नाही, त्यांना घ्यायचे नाही अशा काही चाळण्या लावण्यात आल्या होत्या. त्यातच मुख्यमंत्री फडणवीस यांचे ओएसडी चंद्रशेखर वझे यांनी अनेकांच्या मुलाखती घेतल्या. सूत्रांनी सांगितले की, मुख्यमंत्री कार्यालयाने मंत्र्यांकडून शिफारस झालेल्या अधिकाऱ्यांची चौकशी केली. त्यांचे ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, या आधी काही घोटाळ्यांमध्ये त्यांचे नाव आलेले होते का याची गुप्त माहिती घेण्यात आली. आपल्याला पीए, पीएस मिळत नसल्याने कामच करता येत नाही असे म्हणत तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांनी आपापल्या मर्जीतील नावे रेटली, पण त्यातील अनेक नावांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कात्री लावली आहे. अजूनही चार ते पाच मंत्र्यांना पूर्ण स्टाफ मिळालेला नाही.
भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने आपल्या मर्जीतील पीएस हवाच असा हट्ट धरला, हे मंत्री खरेतर फडणवीसांच्या अगदी जवळचे पण त्यांचा हट्ट पुरविला गेला नाही. अन्य एक ज्येष्ठ मंत्री आपल्या मर्जीतील नावासाठी अडून बसले, मग त्यांनी सुचविलेल्या नावाबाबत खातरजमा करण्यात आली आणि मग मंजुरी दिली गेली. भाजपच्या एका कॅबिनेट मंत्र्यांच्या आधीच्या पीएसबाबत त्यांनी, गेल्या कार्यकाळात रा. स्व. संघाकडून आलेली कामे केली नाहीत, अशा तक्रारी करून त्यांचा पत्ता कापण्यात आला.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या चौकशीनंतर नियुक्तीचा निर्णय
गेल्या मंत्रिमंडळात दीपक केसरकर यांचे पीएस असलेले मंगेश शिंदे हे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे पीएस झाले आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप होत असताना प्रशांत भामरे हे पूर्वीप्रमाणेच त्यांचे पीएस झाले आहेत. त्यांच्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने बरीच चौकशी केल्यानंतर नियुक्तीचा निर्णय घेतला, अशी माहिती आहे. २०१४ मध्ये पंकजा मुंडे मंत्री असताना त्यांचे पीएस राहिलेले मंदार वैद्य परतले आहेत. सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी संतोष पाटील हे माणिकराव कोकाटे यांचे पीएस असतील. जयराज कारभारी हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे नवे पीएस असतील.