‘त्या’ कॉलची चौकशी अंतिम टप्प्यात

By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:08+5:302016-06-07T07:43:08+5:30

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि दाऊद इब्राहिम यांच्यातील कथित दूरध्वनी संभाषणाच्या चौकशीत लवकरच मोठी प्रगती होईल.

In the final phase of the call inquiry | ‘त्या’ कॉलची चौकशी अंतिम टप्प्यात

‘त्या’ कॉलची चौकशी अंतिम टप्प्यात

डिप्पी वांकाणी,

मुंबई- माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि दाऊद इब्राहिम यांच्यातील कथित दूरध्वनी संभाषणाच्या चौकशीत लवकरच मोठी प्रगती होईल. कारण, मोबाइल कंपन्यांकडून केवळ एका महिन्याच्या दूरध्वनी संभाषण नोंदींची (कॉल डाटा रेकॉर्ड्स अर्थात सीडीआर) माहिती मिळायची आहे. गृह विभागातील सूत्रांनी ही माहिती दिली.
खडसे आणि दाऊद इब्राहिम यांच्यात फोन कॉल्स झाले किंवा नाहीत हे सीडीआरद्वारे स्पष्ट होईल; मात्र तपास अधिकारी खडसे व दाऊदमध्ये फोन कॉल्स झाल्याचा आरोप करणाऱ्या एथिकल हॅकरचीही चौकशी करणार आहेत. हॅकरने पाकिस्तानच्या टेलिफोन सेवा पुरवठादाराकडून फोन कॉल्सची माहिती कशी प्राप्त केली हे त्यांना माहीत करून घ्यायचे आहे, असे या सूत्रांनी सांगितले.
दाऊदची पत्नी मेहजबीन हिच्या नावावर असलेल्या लॅण्डलाइन क्रमांकावरून खडसेंच्या मोबाइलवर सप्टेंबर २०१५ ते एप्रिल २०१६ दरम्यान फोन कॉल्स झाल्याचा आरोप इथिकल हॅकर मनिष भंगाळे याने केला होता; मात्र या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेने खडसेंच्या मोबाइलवर या काळात एकही आंतरराष्ट्रीय फोन कॉल झाला नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर भंगाळेने आपली भूमिका बदलत नंतर
जानेवारी ते एप्रिल २०१५ दरम्यान हे फोन कॉल झाल्याचा आरोप
केला.
मोबाइल सेवा पुरविणाऱ्या कंपन्या एक वर्षापर्यंतचाच सीडीआर ठेवतात. त्यामुळे गुन्हे शाखेने तातडीने खडसेंच्या मोबाइलचा सप्टेंबर २०१५ ते एप्रिल २०१६ दरम्यानचा सीडीआर मिळविला व त्याचे अवलोकन करून त्या काळात त्यांच्या फोनवरून कोणताही आंतरराष्ट्रीय फोन कॉल्स न झाल्याचे स्पष्ट केले. मोबाइल कंपनीने पोलिसांना तसे लेखी दिले आहे, असे सूत्रांनी सांगितले.
>१४ जूनपर्यंत सुनावणी तहकूब
कथित दूरध्वनी संभाषणाच्या सीबीआय चौकशीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी सोमवारी कोर्टाने १४ जूनपर्यंत तहकूब केली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी उच्च न्यायालयाने सीबीआयच्या अधिकाऱ्यांचे विशेष पथक नेमावे, तसेच आपल्याला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी बडोदा येथील एथिकल हॅकर मनिष भंगाळे याने याचिकेद्वारे केली आहे.
न्या. नरेश पाटील व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर भंगाळे याच्या वकील अपर्णा वटकर यांनी ही याचिका सादर केली. या प्रकरणाची माहिती देण्यासाठी प्रंतप्रधानांसह नॅशनल सिक्युरिटी अ‍ॅडव्हायझर्सना भेटण्याचे प्रयत्न केले. मात्र, सगळे प्रयत्न व्यर्थ गेले. अद्याप खडसेंविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही, असे याचिकेत म्हटले आहे.
पोलिसांना दिलेली सर्व माहिती दडपण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी भीतीही भंगाळेने व्यक्त केली आहे. ‘जबानी नोंदवून सर्व पुरावे घेण्याऐवजी राज्य सरकार आणि पोलिसांनी खडसे यांना ‘क्लीन चिट’ देण्याची घाई केली. दाऊद इब्राहिमच्या टेलीफोन बिल्सवरून दाऊदचे आर्थिक जाळे कुठवर पसरले आहे, हे सरकारला कळेल. चित्रपटांपासून क्रिकेट बेटिंगपर्यंत दाऊदचे साम्राज्य पसरले आहे,’ असे भंगाळे याने याचिकेत म्हटले आहे.
भाजपा कार्यकर्त्यांची निदर्शने
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या समर्थनार्थ जळगावहून आलेल्या काही कार्यकर्त्यांनी सोमवारी भाजपाच्या येथील प्रदेश कार्यालयासमोर निदर्शने केली. सुमारे ३० कार्यकर्त्यांनी खडसेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आणि फलक फडकाविले. खान्देश हित संग्राम संघटनेचे हे कार्यकर्ते होते. भाजपामध्ये अनेक वर्षे निष्ठेने काम केलेले खडसे हे बहुजन समाजाचे असल्याने अन्याय होत असल्याची भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या वेळी प्रदेश कार्यालयाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त होता.


>खडसेंवर मकोका लावा - निरुपम


राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप असल्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याखाली (मकोका) कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत त्यांची चौकशी करणे ही अतिशय किरकोळ कारवाई आहे, असे सांगून ते म्हणाले की, खडसे यांना दाउदच्या पाकिस्तानातील घरून फोन आल्याचा आरोप असताना केवळ त्यांच्या राजीनाम्याने जनतेचे समाधान होणार नाही. पुणे येथील एमआयडीसीचा
भूखंड पत्नी व जावयाच्या नावावर केल्याबद्दल खडसे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखालीही कारवाई होणे गरजेचे आहे. दहशतवादविरोधी पथकाकडेच तपास सोपवणे आवश्यक आहे, असे निरुपम यांनी म्हटले आहे.

Web Title: In the final phase of the call inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.