‘वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरा’; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 05:52 IST2025-01-30T05:51:57+5:302025-01-30T05:52:26+5:30
रुग्णालयात गैरहजर राहणाऱ्या बंधपत्रित डॉक्टरांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.

‘वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरा’; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी दिले. आरोग्य विभागाच्या प्रतीक्षा यादीवरील एमबीबीएस उमेदवारांना तातडीने नियुक्ती देऊन, मार्च अगोदर डॉक्टरांची नवीन भरती प्रकिया सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
रायगड जिल्ह्यातील आरोग्यविषयक बाबींचा आढावा रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. या बैठकीला आरोग्य सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव वीरेंद्र सिंह, आयुक्त अमगोथू श्री रंगा नायक, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर आदी उपस्थित होते. रुग्णालयात गैरहजर राहणाऱ्या बंधपत्रित डॉक्टरांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. रुग्णालयांत डॉक्टर हजर राहावेत, अशी ताकीद डॉक्टरांना देण्यात आली आहे.
पुन्हा सेवेची संधी
आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झालेले वैद्यकीय अधिकारी आणि तज्ज्ञ यांना परत सेवेत घेण्यात येणार आहे. त्यासाठी वेळप्रसंगी नियमात बदल करण्याच्या सूचनाही आरोग्य मंत्र्यांनी दिल्या. रोजगार हमी मंत्री गोगावले यांनी रायगड जिल्ह्यातील वाढते औद्योगीकिकरण व मुंबई-गोवा महामार्गावरील अपघात यामुळे ट्रामा केअर सेंटर वाढवण्याची, दोन डायलेसिस सेंटर वाढवण्याची, तसेच डॉक्टरांच्या रिक्त जागा तातडीने भरण्याची मागणी केली.
रुग्णालयांना, वैद्यकीय संस्थांना देणार भेटी
आरोग्य विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देऊन रुग्णालयांतील स्वच्छता, सुरक्षा, परिसर स्वच्छता, रुग्णांच्या आहाराचा दर्जा, रुग्णालयात रुग्ण आणि त्यांच्या नातलगांना मिळणारी वागणूक, औषधांची उपलब्धता, बाह्य संस्थेद्वारे नेमलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधन, तेथील सोयी-सुविधा, गैरसोयी आदी बाबींची पाहणी करावी, असे निर्देश आरोग्य मंत्र्यांनी दिले. तसेच आरोग्य मंत्री स्वतः ही वैद्यकीय संस्थांना अचानक भेटी देणार आहेत.