राष्ट्रवादीच्या सदस्यांना पळविण्यासाठी बंदुकीचा धाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 11:00 IST2019-12-30T10:55:35+5:302019-12-30T11:00:44+5:30
भाजपचे आमदार राणाजगतसिंह पाटील यांच्यासह १८ जणांविरुध्द गुन्हा

राष्ट्रवादीच्या सदस्यांना पळविण्यासाठी बंदुकीचा धाक
सोलापूर : कळंब (जि. उस्मानाबाद) पंचायत समितीतील राष्ट्रवादीच्या चार सदस्याला पळवून नेण्यासाठी बंदुकीचा धाक दाखविल्याच्या आरोपावरुन भाजपचे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांच्यासह १७ ते १८ जणांविरुध्द अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेत आमदार पाटील यांनाही मारहाण झाल्याचे वृत्त आहे.
याप्रकरणी हिंम्मतराव पाटील (रा. बोरगाव माळेवाडी, ता. माळशिरस) यांनी फिर्याद दिली आहे. कळंब पंचायत समितीची निवडणूक ३१ डिसेंबर रोजी होणार आहे. निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मूळ राष्ट्रवादीत असलेल्या काही सदस्यांना आपल्या ताब्यात दिले होते. यातील चार सदस्य हिंमतराव पाटील यांच्या बोरगाव माळेवाडी येथील निवासस्थानी मुक्कामी होते. राणाजगजितसिंह यांच्यासह १९ लोक रविवारी रात्री बोरगाव येथे दाखल झाले. त्यांनी सदस्याला ताब्यात देण्याची मागणी केली. नकार दिल्याने बंदुकीचा धाक दाखविला, अशी फिर्याद हिंमतराव पाटील यांनी अकलूज पोलिस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी राणाजगजितसिंह यांच्यासह १७ ते १८ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हिंमतराव पाटील यांच्या घरी उस्मानाबादचे लोक घुसून दमदाटी करीत असल्याची वार्ता रात्री गावात पसरली. या ठिकाणी जमाव जमला. जमावाने राणाजगजितसिंह पाटील यांच्यासोबतच्या चौघांना मारहाण केली. सध्या पोलिसांनी राणा पाटील यांच्या सोबत असलेल्या पोपट ज्ञानदेव चव्हाण, सतीश सत्यनारायण, गणेश नारायण भातलवंडे यांना अटक केली आहे. इतरांचा शोध सुरू आहे. राणाजगजितसिंह पाटील, सतीश दंडनाईक, गणेश भातलवंडे, दयाशंकर कंकाळ, धीरज वीर, मनोगत शिनगारे, अरुण चौधरी, प्रणव चव्हाण, दत्तात्रय साळुंखे, मेघराज देशमुख, पोपट चव्हाण व इतर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.