ST Employee: वडिलांचा पगार कमी, शिक्षणासाठी पैसे नाहीत; ST कर्मचाऱ्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 15:53 IST2021-10-30T15:52:47+5:302021-10-30T15:53:03+5:30
मालेगावात एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या युवकावर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ST Employee: वडिलांचा पगार कमी, शिक्षणासाठी पैसे नाहीत; ST कर्मचाऱ्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल
नाशिक – ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यभरात ST कर्मचारी विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. ST चं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं ही कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. त्याचसोबत महागाई भत्ता, घरभाडं आणि पगार वाढवण्याचा आग्रह कर्मचाऱ्यांनी केला आहे. शुक्रवारीच एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यानं राज्यात खळबळ माजली होती. त्यातच आणखी एक दुर्दैवी प्रकार समोर आला आहे.
मालेगावात एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या युवकावर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कर्मचारी शिवसाद शिंदे यांचा मुलाने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. वडिलांना ST च्या नोकरीत मिळणारा तुटपुंजा पगार त्यामुळे मनासारखं शिक्षण घेता येत नाही. म्हणून मुलाने आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यामुळे राज्यभरात ST कर्मचाऱ्यांना प्रश्न किती गंभीर बनत चालला आहे हे यातून दिसून येते.
एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई, नोटीस देण्याचे प्रशासनाला आदेश
बुधवारपासून आपल्या विविध मागण्यांसाठी ST कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले होते. मात्र गुरुवारी मागण्या मान्य होऊन ते मागे घेण्यात आल्यानंतरही काही आगारांमध्ये शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी प्रशासनाला दिले.
गळफास घेऊन ST कर्मचाऱ्याची आत्महत्या
परिवहन महामंडळाच्या चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली. शेवगाव आगारातील दिलीप हरिभाऊ काकडे असे आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते चालक म्हणून येथील आगारात कार्यरत होते. डेपोत उभ्या असलेल्या एसटीच्या मागील बाजूस गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच आगराच्या अन्य कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी डेपोत धाव घेतली. पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना समजताच मोठी खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.