भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 18:18 IST2025-08-23T18:06:04+5:302025-08-23T18:18:54+5:30
वर्षातील ३६५ दिवसांपैकी ३२२ दिवस शेतकऱ्याला संकटाचे दिवस येणार आहेत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे असं पाशा पटेल यांनी म्हटलं.

भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
धाराशिव - पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जेवढे शेतकऱ्याचे नुकसान झालंय त्याची भरपाई करण्याची क्षमता कुणाची नाही. सरकारच्या वतीने नुकसान भरपाई करत नाही मदत केली जाते. मदतीवर नुकसानीची भरपाई भरून काढणे शक्य नाही. शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी. आपले भोग भोगावे लागतील असा अजब सल्ला भाजपा नेते आणि केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिला आहे.
पाशा पटेल म्हणाले की, सध्या जे शेतकऱ्यांचे नुकसान होतंय, त्याची सवय करून घ्यावी लागणार आहे कारण हे वारंवार घडत आहे. कधी पाऊस जास्त पडून, कधी पाऊस न पडून, कधी दुष्काळाने, कधी गारपीट, कधी अतिवृष्टी यामुळे वर्षातील ३६५ दिवसांपैकी ३२२ दिवस शेतकऱ्याला संकटाचे दिवस येणार आहेत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आपण इतका प्रचंड निसर्गाचा नास केला आहे. त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत असं त्यांनी सांगितले.
पाशा पटेल यांच्यावर शेतकरी नेते संतापले
तर जागतिक तापमानामुळे निसर्गाचा लहरीपणा वाढला आहे. त्यामुळे सातत्याने शेतकऱ्यांना नुकसानीची सवय करून घ्यावी लागेल. सरकारवर अवलंबून राहू नका, नुकसानीची मानसिकता ठेवा असा सल्ला पाशा पटेल यांनी दिला. ते शेतकरी नेते आहेत, त्यांचे हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता नाही असं शरद जोशी म्हणायचे, पण शेतकऱ्यांना त्याच दारिद्र्यात खितपत पडावे म्हणून सरकारने त्यांच्या उरावरून उठावे, शेतकरी सक्षमपणे त्यांचा व्यवसाय करू शकतात. शेतकऱ्याला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला भाव मिळतो, तेव्हा आयात केली जाते किंवा निर्यातीवर बंदी घातली जाते. व्यापारी मंदीत फायदा कमावतात, त्याउलट जेव्हा शेतमालाला भाव येतो तेव्हा सरकार काळे मांजर आडवे आल्यासारखे येते. निर्यातबंदी लावते, कर वाढवते, कांदा, कापूस, साखर सगळ्याबाबतीत हे होते. परंतु जेव्हा आपत्ती येते तेव्हा शेतकऱ्याला सल्ला दिला जातो. हे पाशा पटेल नाहीत तर त्यांच्या तोंडातून सरकार बोलत आहे. सरकारने कांद्यावर निर्यात बंदी का लावली, पामतेलावरील आयात कर कमी केला या गोष्टीचे उत्तर सरकारने द्यावे असा टोला शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी लगावला आहे.