Farmers will announce the first list of loan waivers tomorrow, Chief Minister announced | शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर करणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर करणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

ठळक मुद्देशेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. . शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या म्हणजे 24 फेब्रुवारीला जाहीर होणार असून, दुसरी यादी 28 फेब्रुवारीला जाहीर करणार असल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घोषणा केली आहे. येत्या तीन महिन्यांत ही कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. पहिल्या सरकारची कर्जमाफीची योजना अजूनही सुरू आहे.

मुंबईः शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या म्हणजे 24 फेब्रुवारीला जाहीर होणार असून, दुसरी यादी 28 फेब्रुवारीला जाहीर करणार असल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घोषणा केली आहे. महाविकास आघाडी सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. येत्या तीन महिन्यांत ही कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. पहिल्या सरकारची कर्जमाफीची योजना अजूनही सुरू आहे, त्यामुळे सर्व गोष्टी पूर्ण करूनच पुढे जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. 

2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असून, उद्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करणार आहे. तसेच गिरणी कामगारांच्या घरासाठी 1 मार्च रोजी लॉटरी निघणार आहे. 35 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची यादी तयार केली असून, टप्प्याटप्प्याने कर्जमाफीची अंमलबजावणी करणार आहे. सरकारच्या योजना उघड्या डोळ्याने विरोधकांनी बघाव्या, असा चिमटाही उद्धव ठाकरेंनी विरोधकांना काढला आहे. 

विरोधी पक्षाने केवळ टीका न करता सरकारच्या चांगल्या कामाचं कौतुकही करावं, सशक्त विरोध पक्ष म्हणून काम करावं. स्वतः काही करायचं नाही आणि आम्ही केलेल्या चांगल्या गोष्टींवर टीका करायची, अशी भूमिका विरोधी पक्षाची आहे. त्यामुळे विरोधकांच्या सर्वच प्रश्नांची उत्तर देण्याची गरज वाटत नसल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. 

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे, येथे सीएएवरून दंगे झाले नाही, मात्र, भाजपशासित राज्यांमध्ये दंगली झाल्या. जेएनयूमध्ये दहशतवादी घुसले, त्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला, त्यांच्यावर कारवाई झालेली नाही, त्यामुळे भाजपाने बुडाखाली किती अंधार हे पाहावं, अशी जळजळीत टीकाही उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली आहे. 

Web Title: Farmers will announce the first list of loan waivers tomorrow, Chief Minister announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.