बिकट स्थितीमुळं शेतकरी पुत्रांची लग्न होईना; नवनीत राणांनी लोकसभेत मांडली व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 11:05 IST2019-07-17T11:04:39+5:302019-07-17T11:05:04+5:30
विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील ३३ वर्षांपूर्वी एका शेतकरी कुटुंबाने आत्महत्या केली होती. तेव्हापासून महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे लोण पसरल्याचे ननवीत राणा यांनी लोकसभेत सांगितले.

बिकट स्थितीमुळं शेतकरी पुत्रांची लग्न होईना; नवनीत राणांनी लोकसभेत मांडली व्यथा
नवी दिल्ली - देशात पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक शेतकरी आत्महत्येवर गाजणार असच दिसत आहे. राज्यातील नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत शेतकरी समस्यांना वाचा फोडली.
नवनीत राणा म्हणाल्या की, शहरांना बाजुला ठेवून ग्रामीण महाराष्ट्रावर आपण चर्चा करूया. एकेकाळी महाराष्ट्राची ओळख वेगळी होती. परंतु, आता महाराष्ट्र राज्य शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध होत आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. देशात मागील ४० वर्षांत साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहेत. यापैकी ८० हजार शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रातील आहेत. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील ३३ वर्षांपूर्वी एका शेतकरी कुटुंबाने आत्महत्या केली होती. तेव्हापासून महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे लोण पसरल्याचे ननवीत राणा यांनी लोकसभेत सांगितले.
यंदाही राज्यात अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाची योग्य किंमत मिळत नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून डायरेक्ट खरेदी करावी, यासाठी आपण आदेश द्यावेत, अशी मागणी राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली. शेतकऱ्यांच्या मुलांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. आज शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाच्या समस्या निर्माण होत आहे. शेतकरी म्हटलं की, स्थळ येत नाहीत. शेतकऱ्याच्या घरी आपल्या मुलीला दोन वेळचं जेवन मिळणार नाही, असा विचार मुलींकडचे करत आहेत. ही परिस्थिती भीषण असल्याचे नवनीत राणा यांनी नमूद केले.