‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 06:56 IST2025-09-21T06:56:16+5:302025-09-21T06:56:42+5:30
अतिवृष्टीग्रस्त एकही शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही कृषिमंत्री भरणे यांनी दिली.

‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
अकोला : यंदा पावसाच्या तडाख्यात राज्यात पिकांसह जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नैसर्गिक संकटाच्या परिस्थितीत हताश होऊ नका, असे सांगत नुकसानाचे पंचनामे करून लवकरच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे, अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी येथे दिली. डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्या वतीने कृषी विद्यापीठात आयोजित तीनदिवसीय खरीप शिवार फेरी व चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यंदा राज्यात अतिवृष्टीचे संकट उद्भवले असून, आतापर्यंत ६३ लाख ५१ हजार ५२० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे आणि जमिनीचे नुकसान झाल्याचे सांगत, राज्य शासन शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी असून, अतिवृष्टीग्रस्त एकही शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही कृषिमंत्री भरणे यांनी दिली.
सहलीवर गेलेल्या ‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाई
अतिवृष्टीने आर्णीसह महागाव तालुक्यात पूरस्थिती निर्माण होऊन शेतीचे नुकसान झाले आहे. अशा संकटाच्या काळात काही तलाठी तसेच मंडळ अधिकारी सहलीवर गेल्याची माहिती पुढे आली आहे. संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी दिली. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या नजरा मदतीसाठी शासनाकडे लागल्या आहेत. या संबंधी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले. अशा काळात कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडायला नको होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.