Manikrao Kokate Controversial statement on Farmers : भाजपा महायुती सरकारमधील मंत्र्यांचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला नाही. शेतकऱ्यांना भिकारी म्हणून अपमान करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदावर बसण्याचा अधिकार नाही. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा घेऊन घरी पाठवावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. 'हल्ली भिकारीही एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा दिला', असे विधान कोकोटे यांनी केले होते. त्या विधानावर तीव्र आक्षेप व्यक्त करत, काँग्रेस नेत्याने माणिकराव कोकाटे व भाजपा महायुती सरकारवर तोफ डागली.
"शेतकरी अन्नदाता आहे, देशाचा मालक आहे, तो घाम गाळून पिकवतो म्हणून आपल्या ताटात अन्न येते. स्वतः उपाशी राहून तो लोकांचे पोट भरतो. त्या शेतकऱ्यांना भिकारी म्हणण्याची हिम्मत कशी होते? पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाला आहे पण भ्रष्टाचार होतच असतात असेही कृषी मंत्री कोकाटे म्हणत आहेत. सरकारमधील लोकांना काही लाजलज्जा आहे का? कसले लोक मंत्रिमंडळात घेतले आहेत?" असा सवाल लोंढे यांनी विचारला. तसेच अजित पवार यांनी कोकाटेंच्या पक्षाचे प्रमुख म्हणून या प्रकरणात लक्ष घालावे, अशी अपेक्षाही अतुल लोंढे यांनी व्यक्त केली.
काय म्हणाले होते माणिकराव कोकाटे?
"हल्ली भिकारी देखील एक रुपया घेत नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना लागू केली. ही योजना चांगली आहे. त्यामुळे या योजनेला चांगला प्रतिसाद देखील मिळाला. पण, या योजनेलाही गैरव्यवहाराचे ग्रहण लागले. यामुळे सरकार अडचणीत आलेले नाही, पण यातून आता काही सुधारणा निश्चितपणे कराव्या लागणार आहेत. ही योजना सरकारला कोणत्याही स्थिती बंद करायची नाही. त्यात सुधारणा करायची आहे. या प्रकरणी गैरप्रकार टाळण्यासाठी काही ठोस निर्णय घ्यावे लागतील. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत याविषयी योग्य तो निर्णय घेतला जाईल," असे माणिकराव कोकाटे यांनी विधान केले होते. त्यावरून काँग्रेसने त्यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.