तब्बल सहा कोटींची ‘फॅन्सी’ कमाई
By Admin | Updated: March 28, 2015 00:05 IST2015-03-27T22:37:27+5:302015-03-28T00:05:17+5:30
वास्तुशास्त्रज्ञ, ज्योतिषी यांच्या सांगण्यावरून क्रमांक घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तब्बल सहा कोटींची ‘फॅन्सी’ कमाई

तब्बल सहा कोटींची ‘फॅन्सी’ कमाई
कोल्हापूरकरांचा नादच खुळा : गाडी चाळीस हजारांची, नंबरसाठी पन्नास हजार!
कोल्हापूर : कोल्हापूर हे आर्थिकदृष्ट्या संपन्न शहर असले, तरी हौसी लोकांचे शहर म्हणूनही कोल्हापूरची संपूर्ण राज्यात ख्याती आहे. यात कोल्हापूरकरांचे वाहनप्रेम तर सांगायलाच नको. वाहनाबरोबरच त्याचा क्रमांकही ‘फॅन्सी’ हवा. या ‘फॅन्सी’ क्रमांकासाठी वर्षभरात एक, दोन नव्हे, तर तब्बल ६ कोटी २ लाख २२ हजार ७४५ रुपयांचा महसूल ‘आरटीओ’ कोल्हापूरच्या खात्यात जमा झाला आहे. गाडी कोणतीही असो; त्या गाडीला फॅन्सी क्रमांक हा हवाच, अशी मानसिकताच येथील लोकांची झाली आहे. त्यामुळे नवीन गाडी घेतल्यानंतर आपल्याला हवा तसा क्रमांक मिळाला तर बरा; नाहीतर महिनोन्महिने प्रतीक्षा करण्याची व विनाक्रमांक गाडी फिरविण्याची त्यांची सहज तयारी असते. एकाच क्रमांकाला जादा लोकांची पसंती असेल, तर त्याप्रमाणे लिलावाद्वारे तो क्रमांक दिला जातो. १ एप्रिल २०१४ ते २५ मार्च २०१५ या संपूर्ण वर्षात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केवळ फॅन्सी क्रमांकाच्या माध्यमातून ६ कोटी २ लाख २२ हजार ७४५ इतके रुपये आपल्या महसुलात जमा केले आहेत. सध्या क्रमांक एकसाठी चारचाकी वाहनाला किमान एक लाख, तर दुचाकीला २५ हजार रुपये मोजावे लागतात. याशिवाय ९, ९९९, १११, ३३३, ७८६, ४४४, ५५५ या क्रमांकांना ५० हजार रुपये मोजावे लागतात. हा अधिकचा महसूल केवळ फॅन्सी क्रमांकांतून मिळत आहे. यंदा एक, सात आणि नऊ या क्रमांकांना अधिक पसंती आहे. त्याचबरोबर राम, दादा, काका, मामा, राज अशा नावासारख्या क्रमांकांनाही मोठी पसंती आहे. २, ३, ४, ५, ७, ८, १०, ११, २२ या क्रमांकांसाठी चारचाकीला २५ हजार, तर दुचाकीला पाच हजार इतके पैसे वाहनधारकांना मोजावे लागतात. किमान २००० ते १ लाख रुपये इतके केवळ हव्या त्या क्रमांकासाठी मोजणाऱ्या कोल्हापूरकरांच्या हौसेला मोल नाही, हेच खरे.
काही दुचाकींची किंमत पन्नास ते पंचावन्न हजार इतकी आहे. मात्र, या दुचाकीला एकच क्रमांक पाहिजे म्हणून वर्षभरात किमान २३ जणांनी गाडीच्याच किमतीएवढे म्हणजे ५० हजार इतके भरले आहेत. वास्तुशास्त्रज्ञ, ज्योतिषी यांच्या सांगण्यावरून क्रमांक घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे.