वेतन रखडल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय करणार उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 06:54 IST2020-10-05T03:10:30+5:302020-10-05T06:54:01+5:30
एसटी कर्मचारी काँग्रेसच्या कार्यकारिणीत मान्यता घेऊन आंदोलन करण्यात येणार

वेतन रखडल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय करणार उपोषण
मुंबई : तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. त्याचा फटका त्यांच्या कुटुंबीयांना बसला आहे. शाळेची फी थकली, घरखर्चाला पैसे नाहीत. १५ तारखेपर्यंत जर तीन महिन्यांचा पगार मिळाला नाही तर कर्मचाºयांचे कुटुंबीय उपोषण करणार आहेत.
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन थकीत असून ते अद्याप मिळालेले नाही. कोरोनाच्या महामारीत एसटी कामगार जीवाची बाजी लावून काम करीत असताना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याने एसटी कर्मचारी हवालदिल झाले आहेत. अनेकांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे वाढले आहे. सरकारने एसटी महामंडळाला वेतनासाठी पैसे द्यावेत अन्यथा आमचा संयम सुटत चालला आहे. याबाबत एसटी कर्मचारी काँग्रेसच्या कार्यकारिणीत मान्यता घेऊन आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये कर्मचाºयांसह कुटुंबीय असणार आहेत. त्यामुळे एसटी वाहतुकीवर परिणाम होणार नाही.
उपासमारीमुळे तर काही जणांनी टोकाचे पाऊलही उचलले आहे. एसटी एका कर्मचाऱ्यांच्या पत्नीने एक व्हिडीओ तयार करत आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. उदरनिर्वाहासाठी मला रोजंदारीवर काम करायचे आहे, त्यामुळे तीन दिवस रजा द्या, अशी मागणी केली आहे.