फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 06:43 IST2025-07-18T06:42:44+5:302025-07-18T06:43:09+5:30
विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या दालनात गुरुवारी दुपारी हे दोन नेते एकमेकांना भेटले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप आहे, वेगळा विचार करता येईल,’ या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ऑफर दिली आणि गुरुवारी दोघांमध्ये २० मिनिटे वन टू वन बंदद्वार चर्चा झाली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या दालनात गुरुवारी दुपारी हे दोन नेते एकमेकांना भेटले. एरवी या दोघांमधील कटूता, एकमेकांवर सातत्याने टीका करणे, हे सर्वविदित असताना आजची भेट ही कालच्या ऑफरचा टप्पा दोन होती का? अशी चर्चा विधानभवनात रंगली.
उद्धव आणि राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र येण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. ‘एकत्र आलो आहोत, एकत्र येण्यासाठी’ असे उद्धव ठाकरे यांनी मराठी विजय मेळाव्यात जाहीरपणे म्हटले होते. मात्र, गेले काही दिवस दोन्ही भावांनी एकत्र येण्याबाबत सावध भूमिका घेतली आहे. त्यातच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभप्रसंगी विधान परिषदेत बोलताना फडणवीस यांनी ठाकरे यांना दिलेली ऑफर चर्चेचा विषय ठरली होती. त्याला २४ तासही होत नाहीत तोच दोघांनी बंदद्वार चर्चा केल्याने पुढे काही राजकीय बदल होतील का? असे राजकीय वर्तुळात चर्चिले जाऊ लागले आहे.
पुस्तक दिले भेट
या भेटीनंतर सभापती राम शिंदे, आदित्य ठाकरे, सुनील प्रभू, सचिन अहिर यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांनी ‘हिंदीची सक्ती कशाला?’ हे पुस्तक मुख्यमंत्री फडणवीस यांना भेट म्हणून दिले.
मराठीचा आग्रह धरतानाच हिंदीची कोणतीही सक्ती करण्याची गरज का नाही, याबाबतचे तपशीलवार विवेचन या पुस्तकात करण्यात आले आहे.
विरोधी पक्षनेत्याची विनंती : विधिमंडळाच्या चालू अधिवेशनाचा शुक्रवार शेवटचा दिवस आहे. त्यामुळे किमान आता तरी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची संधी आम्हाला द्या, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी आजच्या भेटीत फडणवीस यांना केली. या पदासाठी भास्कर जाधव यांना संधी देण्याचा आग्रह ठाकरे यांनी धरल्याचे समजते. त्यामुळे शुक्रवारी जाधव यांच्या नावाची घोषणा होणार का, याबाबत उत्सुकता आहे.