Fact Check: उद्धव ठाकरेंबाबतचे FAKE क्रिएटिव्ह व्हायरल; 'लोकमत'चं नाव-लोगो वापरून वाचकांची दिशाभूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 14:10 IST2024-08-08T14:05:44+5:302024-08-08T14:10:47+5:30
Waqf Board : उद्धव ठाकरे यांच्याबाबतचे एक दिशाभूल करणारे क्रिएटिव्ह 'लोकमत'च्या नावाने व्हायरल करण्यात आलं आहे.

Fact Check: उद्धव ठाकरेंबाबतचे FAKE क्रिएटिव्ह व्हायरल; 'लोकमत'चं नाव-लोगो वापरून वाचकांची दिशाभूल
Uddhav Thackeray ( Marathi News ) : संसदेच्या अधिवेशनात केंद्र सरकार वक्फ बोर्डबाबतच्या कायद्यात बदल करण्याच्या तयारीत असून याबाबतचे वक्फ संशोधन विधेयक संसदेत मांडलं जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी एनडीए आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. वक्फ संशोधन विधेयकाबाबत विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबतचे एक दिशाभूल करणारे क्रिएटिव्ह 'लोकमत'च्या नावाने व्हायरल करण्यात आलं आहे. मात्र असं कोणतंही क्रिएटिव्ह 'लोकमत'कडून करण्यात आलं नसून सोशल मीडियात एका विशिष्ट विचारधारेच्या समर्थकांनी 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून केलेला हा खोडसाळपणा आहे.
'लोकमत'च्या नावाने व्हायरल करण्यात आलेल्या क्रिएटिव्हमध्ये उद्धव ठाकरेंचा फोटो वापरण्यात आला असून त्यांनी वक्फ संशोधन विधेयकावरून सरकारवर टीका केल्याचं भासवण्यात आलं आहे. "मी एकच सांगतो की केंद्राने वक्फ बोर्डवर बंधने आणू नयेत, वक्फ बोर्डच्या जमिनी त्यांच्या हक्काच्या आहेत, मेहनतीने मिळवल्या आहेत, त्या मुसलमानांच्याच आहेत, मंदिरांसाठी वक्फ बोर्डचा बळी खपवून घेणार नाही," असं उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचं या फेक क्रिएटिव्हमधून सुचवण्यात आलं आहे. परंतु हे क्रिएटिव्ह 'लोकमत'ने केलेलं नाही.
'लोकमत'च्या क्रिएटिव्हशी मिळतंजुळतं टेम्प्लेट वापरून काही लोकांनी हा खोडसाळपणा केला आहे. 'लोकमत डॉट कॉम'च्या ओरिजिनल लोगोमध्ये उजव्या बाजूला कर्व्ह आहे. फेक क्रिएटिव्हमध्ये वापरण्यात आलेला लोगो आणि 'लोकमत डॉट कॉम'च्या ओरिजिनल लोगो यामधील तफावत स्पष्टपणे दिसत आहे.
दरम्यान, अशा कुठल्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता, विश्वासार्ह माहितीसाठी 'लोकमत'च्या अधिकृत फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटला फॉलो करावं, असं आवाहन या निमित्ताने आम्ही आमच्या वाचकांना करतो.