नोटीस पाहून उघडले डोळे! 25 वर्षे संसारानंतर पत्नी, मुलीला सोडून गेलेल्या पतीला दणका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 11:57 IST2017-12-24T11:54:52+5:302017-12-24T11:57:05+5:30
तब्बल 25 वर्षे संसार केल्यानंतर 64 वर्षीय पतीच्या आयुष्यात दुसरी महिला आल्याने पतीने पत्नी आणि मुलीच्या जबाबदारीकडे पाठ फिरविली. तसेच सर्व संपत्ती विकून त्याने दुस-या महिलेकडे

नोटीस पाहून उघडले डोळे! 25 वर्षे संसारानंतर पत्नी, मुलीला सोडून गेलेल्या पतीला दणका
पुणे : तब्बल 25 वर्षे संसार केल्यानंतर 64 वर्षीय पतीच्या आयुष्यात दुसरी महिला आल्याने पतीने पत्नी आणि मुलीच्या जबाबदारीकडे पाठ फिरविली. तसेच सर्व संपत्ती विकून त्याने दुस-या महिलेकडे जाण्याची तयारी केली. मात्र, पती आणि वडिलांकडून त्रास देण्यास सुरुवात झाल्याने आई आणि मुलीने न्यायालयात दावा दाखल केला. त्यावर पतीने न्यायालयात दुस-या महिलेला सोडून देण्याचे मान्य करत सर्व जबाबदारी स्वीकारण्याचे मान्य केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. घारगे यांच्या न्यायालयाने हा दावा निकाली काढला.
महिला कौटुंबिक हिंसाचार संरक्षण कायद्याअंतर्गत न्यायालयात हा दावा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी 57 वर्षीय महिलेने आणि तिच्या 23 वर्षीय मुलीने न्यायालयात दावा दाखल केला होता. संबंधित अर्जदार 57 वर्षीय महिलेचे आॅक्टोबर 1992 मध्ये लग्न झाले होते. त्यांना एक मुलगी असून तिचे वय सध्या 23 वर्षे आहे. ही मुलगी इंजिनिअर झाली आहे. न्यायालयाने दोन महिन्यांच्या आत हा दावा निकाली काढला.
संबंधित व्यक्तीची बहीण परदेशात राहत असून काही महिन्यांपासून त्याचे बहिणीच्या घरी जाणे वाढले होते. त्यातून बहिणीच्या घरी येणा-या एका महिलेबरोबर त्याचे प्रेमसंबंध सुरू झाले. दुस-या महिलेबरोबर राहता यावे, म्हणून त्याने सर्व संपत्ती विकण्याची तयारी सुरू केली. घरखचार्साठी पैसे देणेही बंद करून त्याने पत्नी आणि मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली. तो पत्नीला मारहाणही करू लागला.
बहिणीच्या घरी गेलेला असताना त्याच्या मुलीने त्याला व्हिडीओ कॉल केला असता तो दुस-या एका महिलेबरोबर असल्याचे तिला दिसले. याबाबत तिने विचारणा केल्याने त्याने स्वत:च्या मुलीला धमकी देऊन तिला घराबाहेर काढले. त्यामुळे पत्नी आणि मुलीने आॅक्टोबर 2017 मध्ये कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत न्यायालयात अॅड. सुचित मुंदडा, अॅड. शीतल चरखा यांच्यामार्फत दावा दाखल केला.
न्यायालयाकडून नोटीस आल्यानंतर त्याचे डोळे उघडले. त्याने तत्काळ तडजोडीबाबत बोलणी करून पत्नी आणि मुलीला मिळकतीमध्ये पूर्ण अधिकार देण्याचे, मोठी रक्कम कायमस्वरुपी ठेव म्हणून देण्याची तसेच दरमहा खर्चासाठी पैसे देण्याचे आणि परस्त्रीबरोबर कोणतेही नाते न ठेवण्याचे मान्य केले. त्याचप्रमाणे सर्व तडजोड करून पुन्हा एकत्र येण्याची त्याने तयारी दर्शविली.