Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकार आणि विशेषतः काही मंत्र्यांवर थेट हल्लाबोल सुरू केला आहे. केवळ सभागृहाबाहेरच नव्हे, तर सोशल मीडिया पोस्ट्सच्या माध्यमातून ते एकापाठोपाठ एक गंभीर आरोप करत आहेत. आता मंत्र्यांच्या बंगल्यांच्या केवळ कागदोपत्री दुरुस्तीच्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेला ३० कोटींचा घोटाळा आरोप सिद्ध झाल्याचे रोहित पवार यांनी म्हटलं. रोहित पवार यांनी गेल्या वर्षी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. या गंभीर प्रकरणावरून रोहित पवार यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना थेट आव्हान देत तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.
सरकारकडे विकासासाठी निधी नसताना मंत्र्यांच्या बंगल्यांवर ३० कोटींचा खर्च झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. त्यानंतर आता हे दक्षता समितीच्या चौकशीतही सिद्ध झाल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. हा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीकास्त्र डागलं. पुराव्याशिवाय बोलत नाही असे स्पष्ट करत, आगामी हिवाळी अधिवेशनात आणखी मोठे गौप्यस्फोट करत सरकारची धिंड काढल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा रोहित पवार यांनी दिला.
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये सरकारकडे पैसे नाहीत आणि दुसरीकडं भिंतीना ग्रॅनाईटचे कंपाऊंड? कशासाठी असा सवाल केला. "केवळ कागदोपत्री काम दाखवून मंत्र्यांच्या बंगल्यावर ३० कोटी रुपये खर्च केल्याचा घोटाळा सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे आणला असता हा मुद्दा मी गेल्यावर्षीच विधानसभेत मांडला होता. आता दक्षता आणि गुणनियंत्रक मंडळाने केलेल्या चौकशीतही हा घोटाळा झाल्याचं सिद्ध झालं आहे. मंत्र्यांच्या बंगल्यांवर सरकारी पैशाची कशी उधळपट्टी केली, याची विस्तृत चिरफाड या अहवालात केलेली आहे. एकीकडं सरकारकडे पैसे नाही आणि दुसरीकडं भिंतीना ग्रेनाइट चे कंपाऊंड? विशेष म्हणजे बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी आवश्यक असते, परंतु बिचाऱ्या मुख्यमंत्र्यांचीही परवानगी घेतली नसल्याचं या अहवालात समोर आलं आहे.गतवर्षी मी हा मुद्दा मांडला असता मध्येच उभं राहून मोठ्या तावातावाने आरोप खोटे असल्याच्या पोकळ डरकाळ्या फोडणारे मंत्री गुलाबराव पाटील आता यावर स्पष्टीकरण देतील का? दोषी कार्यकारी अभियांत्यासह इतर अभियंत्यांवर अजूनही कारवाई झालेली नाही. तत्काळ कारवाई करा अन्यथा हिवाळी अधिवेशनात सरकारची धींड काढल्याशिवाय राहणार नाही," असं रोहित पवार म्हणाले.
बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेणे बंधनकारक असताना, या कामांसाठी मुख्यमंत्र्यांची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे अहवालात स्पष्ट झाल्याचे रोहित पवार म्हणाले. यावर मंत्री गुलाबराव पाटील स्पष्टीकरण देतील का? असाही सवाल रोहित पवार यांनी केला. घोटाळा सिद्ध होऊनही अद्याप एकाही दोषी अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्याबद्दल आमदार पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. रोहित पवार यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी 'मी पुराव्याशिवाय बोलत नाही' अशी टीप जोडली आहे.
Web Summary : Rohit Pawar alleges a 30-crore scam in minister bungalow renovations, lacking CM's approval. He demands action against involved officials, threatening exposure in the winter session if no action is taken.
Web Summary : रोहित पवार ने मंत्रियों के बंगलों के नवीनीकरण में 30 करोड़ के घोटाले का आरोप लगाया, जिसमें मुख्यमंत्री की मंजूरी नहीं थी। उन्होंने दोषी अधिकारियों के खिलाफ कार्रवाई की मांग की और शीतकालीन सत्र में खुलासा करने की धमकी दी।