"महागाई कशी वाढली हे भोंग्यांमधून सांगावं"; आदित्य ठाकरेंचा राज ठाकरे, भाजपला टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 20:06 IST2022-04-14T20:06:26+5:302022-04-14T20:06:50+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी गुढी पाडवा मेळाव्यानंतर पुन्हा एकदा ठाण्यात उत्तर सभा घेताना मशिदीवरील भोंगे यावर परखड भूमिका मांडली.

"महागाई कशी वाढली हे भोंग्यांमधून सांगावं"; आदित्य ठाकरेंचा राज ठाकरे, भाजपला टोला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी गुढी पाडवा मेळाव्यानंतर पुन्हा एकदा ठाण्यात उत्तर सभा घेताना मशिदीवरील भोंगे यावर परखड भूमिका मांडली. ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे सरकारने मौलवींसोबत चर्चा करून हटवावे अन्यथा मशिदीसमोर भोंगे लावत हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला आहे. राज ठाकरेंनी व्यासपीठावरून केवळ राज्यातच नव्हे तर देशातील प्रत्येक मशिदीवरील भोंगे हटवले नाही तर तेथेही हनुमान चालीसा लावावी असं आवाहन केले होते. दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज ठाकरे आणि भाजपला टोला लगावला आहे.
"भोंग्यांवरून वाढलेल्या किंमतीवरूनही सांगता आलं तर सांगावं, की या वाढलेल्या किंमती पेट्रोल, डिझेल, सीएनजी यांची दरवाढ कशामुळे झाली आहे. गेल्या साठ वर्षांपूर्वी न जाता गेल्या दोन तीन वर्षांमध्ये का झालं हे सांगावं," असं आदित्य ठाकरे म्हणाले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजप आणि राज ठाकरेंवर निशाणा साधला. तर राज ठाकरेंच्या भूमिकेचं भाजपच्या अनेक नेत्यांनी समर्थनही केलं होतं
काय म्हणाले होते राज ठाकरे?
"प्रत्येकाने आपल्या धर्माचे पालन घरात केले पाहिजे. महाराष्ट्रात आम्हाला जातीय दंगली करायच्या नाहीत, परंतु राज्याच्या गृह खात्याने सर्व मौलवींना बोलावून मशिदींवरील भोंगे ईदपूर्वी ३ मेपर्यंत उतरवायला भाग पाडावे. तसे झाले नाही आणि जेथे भोंगे सुरू असतील तेथे हनुमान चालीसा वाजवली जाईल. माझ्या भात्यात आणखीही बाण आहेत. मला ते बाहेर काढायला लावू नका," असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्याच्या सभेत दिला.