शिर्डी विमानतळाचा विस्तार, दोन हेलिपॅड अन् आठ वाहनतळ उभारणार; बैठकीत मान्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 08:37 IST2025-04-26T08:26:28+5:302025-04-26T08:37:33+5:30

अमरावती विमानतळ धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा आराखडा सादर, नाशिकपासून शिर्डी विमानतळ जवळ असल्याने नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या वेळेस हवाई मार्गाने येणाऱ्या भाविकांना शिर्डी विमानतळ सोईचे होणार आहे. 

Expansion of Shirdi airport, two helipads and eight parking lots to be built; approved in the meeting With CM Devendra Fadnavis | शिर्डी विमानतळाचा विस्तार, दोन हेलिपॅड अन् आठ वाहनतळ उभारणार; बैठकीत मान्यता 

शिर्डी विमानतळाचा विस्तार, दोन हेलिपॅड अन् आठ वाहनतळ उभारणार; बैठकीत मान्यता 

मुंबई - आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळ येथे दोन हेलिपॅड व आठ वाहनतळे उभारण्यास व विमानतळाचे विस्तारीकरण, अद्ययावतीकरणास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता दिली.

अमरावती विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा आराखडा सादर करण्याचे निर्देश फडणवीस यांनी यावेळी दिले. महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची ९१ वी बैठक सह्याद्री अतिथीगृहावर झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. प्राधिकरणाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी सादरीकरण केले.

अमरावती येथे उद्योगाचे जाळे  विस्तारत असल्याने धावपट्टी वाढविणे आवश्यक आहे. या विमानतळापासून महसूल मिळविण्यासाठीचा आराखडा तयार करावा. तसेच शिर्डी येथील विमानतळाच्या कार्गो टर्मिनलचे काम वेगाने सुरू आहे. नाशिकपासून शिर्डी विमानतळ जवळ असल्याने नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या वेळेस हवाई मार्गाने येणाऱ्या भाविकांना शिर्डी विमानतळ सोईचे होणार आहे. 

लातूर विमानतळाचा विकास; कराडमध्ये नाइट लँडिंग
लातूर जिल्ह्याचा सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास व विस्तार होत आहे. त्यामुळे लातूर विमानतळ महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठी या विमानतळाचा विकास करण्यात यावा. या विमानतळाचा लातूरसह बीड, धाराशिव या जिल्ह्यांनाही लाभ होईल. तसेच कराड येथील विमानतळाचे काम वेगाने सुरू करून तेथे नाइट लँडिगची सुविधा निर्माण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

चंद्रपुरातील विमानतळावर चार्टर्ड विमाने उतरणार?
चंद्रपूर येथील विमानतळावर चार्टर्ड विमाने उतरू शकतील अशी सुविधा तयार करण्यासाठी तेथील धावपट्टी वाढविण्यात यावी. गडचिरोली येथील विमानतळासाठी दोन ते तीन पर्यायी जागांचा विचार करण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी दिल्या. यावेळी रत्नागिरी, अकोला, कोल्हापूर, नांदेड, धुळे येथील विमानतळांच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. प्राधिकरणाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, संचालक मंडळातील सदस्य तथा वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू उपस्थित होते.

हेलिपॅड आणि टर्मिनल कुंभमेळ्याला होणाऱ्या संभाव्य गर्दीचा विचार करून व नाशिक येथील विमानतळाची क्षमता लक्षात घेता शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या प्रस्तावास यावेळी मान्यता देण्यात आली. यामध्ये ८ वाहनतळे, २ हेलिपॅड यासह टर्मिनलच्या अद्यावतीकरणाचा समावेश आहे.

Web Title: Expansion of Shirdi airport, two helipads and eight parking lots to be built; approved in the meeting With CM Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.