किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 05:49 IST2025-12-19T05:48:46+5:302025-12-19T05:49:21+5:30
किडनी विक्रीपूर्वी झालेल्या वैद्यकीय तपासण्या, प्रवास, आर्थिक व्यवहार, मध्यस्थांची भूमिका यांचा तांत्रिक अभ्यास केला जात आहे.

किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
चंद्रपूर: सावकारांच्या तगाद्यामुळे नागभीड तालुक्यातील मिथूर येथील रोशन कुळे या शेतकऱ्याने कंबोडिया (नानपेन) देशात जाऊन किडनी विकल्याच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने दोन पथके गठित केली आहेत. घटनेतील प्रत्येक दावा आणि प्रत्येक टप्प्याचा फॅक्ट चेक केला जाणार आहे.
किडनी विक्रीपूर्वी झालेल्या वैद्यकीय तपासण्या, प्रवास, आर्थिक व्यवहार, मध्यस्थांची भूमिका यांचा तांत्रिक अभ्यास केला जात आहे. पीडित शेतकरी मानसिकदृष्ट्या स्थिर अवस्थेत आल्यानंतर या प्रकरणातील नेमकी 'लिंक' शोधून काढली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. शेतकरी व त्याचे कुटुंबीय सध्या प्रचंड तणावाखाली आहे.
सावकाराने दीड एकर शेती नावावर करून घेतली
सावकारांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी रोशन कुळे यांनी त्याच्या विविध वाहनांसह साडेतीन एकर शेती विकली. यातील १.५ एकर शेतीची प्रदीप बावनकुळे या अवैध सावकाराने चक्क आपल्या नावावर रजिस्ट्री करून घेतली. खरेदी-विक्रीचा हा व्यवहार नागभीड येथील सहायक निबंधक कार्यालयात १९ एप्रिल २०२२ रोजी करण्यात आला. त्याचा दस्त क्रमांक ३९३ आहे.
शेतकरी आणि सावकाराचे सर्व व्यवहार तपासणार
सावकारी प्रकरणाचा तपास मात्र ब्रह्मपुरी पोलिस करीत असून, अटकेतील पाचही आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.
पीडित शेतकऱ्याने आजवर अवैध सावकारांकडून नेमकी किती रक्कम घेतली, किती परतफेड केली, कोणत्या स्वरूपात पैसे दिले, मालमत्ता विक्रीतून किती रक्कम गेली, याचा सविस्तर हिशेब तपासला जात आहे.
"पोलिसांकडून दोन्ही तपास स्वतंत्रपणे, पण परस्पर समन्वयाने केले जात असून, तपासातून जे निष्पन्न होईल त्यानुसार पुढील गुन्हे नोंदविले जातील."
मुम्मका सुदर्शन, पोलिस अधीक्षक, चंद्रपूर