"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 17:58 IST2025-12-22T17:56:35+5:302025-12-22T17:58:28+5:30
Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंचे भीतीसंगम नाटक फ्लॉफ ठरणार असेही ते म्हणाले.

"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray: विधानसभा निवडणुकांनंतर चर्चेत असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीतही भाजपाने दमदार यश मिळवले. राज्यभरात भाजपाचे अनेक नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले. तुलनेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठा गटाला अपेक्षित यश मिळाले नाही. या अपयशानंतर भाजपाने उबाठा गटाला उद्देशून बोचरी टीका केली. महानगरपालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’ ठरतील आणि उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत' ठरतील अशी टीका भाजपाने केली.
"नगरपालिका, नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना धूळ चारली. नगरपालिकांपाठोपाठ आता महापालिका निवडणुकांमध्ये देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’ ठरणार आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या लोकांना उबाठा गटामध्ये सामील करून घेतले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राऊत हेच रेहमान डकैत असल्याचे भाजपाचे माध्यमविभाग प्रमुख नवनाथ बन म्हणाले. नगर पालिका, नगर पंचायत निवडणुकीत धुरंधर कोण यावर मतदारांनीच शिक्कामोर्तब केल्याचेही ते म्हणाले.
आगामी महापालिका निवडणुकांमध्ये पराभव होण्याची भीती असल्यानेच ठाकरे बंधू एकत्र येऊन ‘प्रीतिसंगम’ नव्हे तर ‘भीतीसंगम’ नाटक सादर करणार आहेत. हा 'भीतीसंगम' प्रयोग मतदार फ्लॉप ठरवणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भावाला घरातून हाकलले, त्यांचा मनसे पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला होता. आता पराभवाच्या भीतीमुळे याच भावासाठी प्रीतीचे खोटे भरते येत असल्याची टीकाही त्यांनी केली.
"राज ठाकरे १०० जागांची मागणी करत असताना त्यांच्या मनसेला ६० जागा देऊन त्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न उबाठा गटाकडून होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्याची होत असलेली विकासाची घोडदौड मतदारांसमोर आहे. म्हणूनच ठाकरे बंधूंच्या या भीतीसंगम नाटकाच्या प्रयोगाचा कितीही गाजावाजा करत घाट घातला तरी ते नाटक रंगमंचावर येण्याआधीच पडणार हे निश्चित आहे. महायुतीचा प्रयोग हाउसफुल्ल होणार आणि मुंबईसह सर्व महापालिका निवडणुकांमध्ये भाजपा महायुतीचाच झेंडा फडकणार," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.