गोळीबार केला तरी शक्तिपीठ महामार्गास विरोधच, राजू शेट्टींनी दिला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 12:42 IST2025-06-25T12:41:20+5:302025-06-25T12:42:05+5:30

मोजणीचा ड्रोन गोफणीने टिपू

Even if firing is done opposition to Shaktipeeth highway will prevail Raju Shetty warns | गोळीबार केला तरी शक्तिपीठ महामार्गास विरोधच, राजू शेट्टींनी दिला इशारा 

गोळीबार केला तरी शक्तिपीठ महामार्गास विरोधच, राजू शेट्टींनी दिला इशारा 

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाच्या प्रकल्प आखणीस आणि भूसंपादनास २० हजार कोटी रुपयांची मान्यता सरकारने दिल्यानंतर अखिल भारतीय किसान सभा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी शक्तिपीठास बाधित शेतकऱ्यांचा विरोध असेलच. पोलिस बळ वापरून विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला तरी शक्तिपीठ महामार्गास विरोध राहील, असा इशारा स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, किसान सभेचे राष्ट्रीय नेते राजन क्षीरसागर यांनी मंगळवारी प्रसिद्धी पत्रकातून दिला.

शेट्टी म्हणाले, राज्यातील १२ जिल्ह्यातून शेतकरी विरोध करीत आहे. मंगळवारी सकाळीच धाराशिव जिल्ह्यातील शेतक-यांनी मोजणी करणा-या अधिका-यांना शेतातून पळवून लावले. तरीही सरकार महामार्ग रेटत आहे. मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचे मालक नव्हे. ते लुटारूंचे टोळके झाले आहे.

शक्तिपीठ महामार्गाबद्दल शेतकरी, सामान्य लोकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना बगल देऊन महामार्ग कामातून ५० हजार कोटींचा ढपला पाडण्याचा डाव आहे. सध्या अनेक योजनांच्या निधीला कात्री लावली आहे. प्रलंबित बिलासाठी ठेकेदार मोर्चे काढत आहेत. अनेक शालेय शिष्यवृत्त्या, योजनांची अनुदान रखडले आहेत. राज्यावर कर्जाचा डोंगर वाढला आहे. तरीही सरकार शक्तिपीठ प्रकल्पावर ८६ हजार कोटी रुपये खर्च करण्यासाठी अट्टहास करीत आहे.

मोजणीचा ड्रोन गोफणीने टिपू

शेतक-यांचा जागेवर येऊन मोजणीस विरोध होऊ लागल्याने ड्रोनच्या माध्यमातून मोजणी करण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. पण शिवार लुटणा-या पाखरांना गोफणीच्या माध्यमातून कसे टिपायचे हे शेतक-यांना चांगले कळते. त्याच पद्धतीने शक्तिपीठ महामार्गाची ड्रोनने मोजणी केल्यास त्याला गोफणीने टिपले जाईल, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.

Web Title: Even if firing is done opposition to Shaktipeeth highway will prevail Raju Shetty warns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.